चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

कल्याण: चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना कल्याण तालुक्यातील आन्हे भिसोळ या गावात घडली आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी संशयखोरपतीला गजाआड केली असून गावात या घटनेने मात्र खळबळ उडाली आहे.

टिटवाळा पोलिसांनी सांगितले की आन्हे भिसोळ गावात आपल्या पत्नीसह राहत असणारा महेश मोहपे (32) याचे तीन वर्षांपूर्वी माही (28) या तरुणीबरोबर रिती रिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. लग्नानंतरच्या काही काळामध्ये महेश आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशयी वृत्तीने पाहत असल्याने त्यांचे नेहमी खटके उडायचे. एका परपुरुषासमवेत आपल्या पत्नीचे प्रेम संबंध असल्याच्या संशयाने त्याच्या मनात चीड निर्माण झाली होती. या कारणामुळे उभयतांमध्ये गुरुवारी जोरदार वादावादी झाल्याने त्याने घरातच आपल्या पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली.

टिटवाळा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पत्नीची हत्या केल्याप्रकरणी महेश मोहपे याला गजाआड केल्याची माहिती टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली.