केळकर यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी फेटाळली

ठाणे: ठाणे शहर विधानसभा निवडणुकीत संजय केळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना गुन्ह्याची माहिती लपवली असल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी केला. त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली. मात्र ही मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळली.

ठाणे मतदार संघातून भाजपकडून पुन्हा एकदा संजय केळकर निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे निवडणूक लढणार आहेत. निवडणूक अर्ज दाखल करताना संजय केळकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात गुन्ह्याची माहिती लपवली आहे असा आरोप विचारे यांनी केला आहे. त्यामुळे फॉर्म बाद व्हावा अशी मागणी विचारे यांनी केली होती.

यासंदर्भात बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. त्या सुनावणीत शिवसेनेची हरकत फेटाळण्यात आली आहे. याबाबत कोणतेही कारण दिले नसून ते कारण लेखी स्वरूपात देण्यात येणार असल्याने हरकत फेटाळण्याचे कारण समजू शकले नाही.