महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कल्याणची वैष्णवी उपविजेती

कल्याण : सांगली येथे महाराष्ट्रात प्रथमच झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सांगलीच्या प्रतीक्षा बागडीने कल्याणच्या वैष्णवी पाटीलचा निसटता पराभव करत महाराष्ट्राची पहिली महाराष्ट्र केसरी होण्याचा किताब पटकावला.

आतापर्यंत फक्त पुरुषांचीच महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा महाराष्ट्र मध्ये संपन्न होत होती. परंतु राज्यामधील महिला कुस्तीपटूंची संख्या पाहता आणि महिला कुस्तीपटूंनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश पाहता महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी यासाठी गेले कित्येक वर्ष लढा सुरू होता. त्याला यश आले आणि पहिल्यांदाच सांगली येथे महिला महाराष्ट्र केसरी किताब ही स्पर्धा भरवण्यात आली.

राज्यातील अनेक दिग्गज महिला खेळाडूंबरोबरच उदयमुख महिला खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन या स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला. कुस्ती म्हटले की पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी अजूनही कायम आहे. यामध्येच सांगली, कोल्हापूर, सातारा यांचा दबदबा पाहण्यास मिळतो. महिला केसरीमध्येही सांगलीच्या प्रतीक्षा बागडीने हे दाखवून दिले. कल्याणची वैष्णवी पाटील हिला निसटता पराभव पत्करावा लागला. महिला महाराष्ट्र केसरी या स्पर्धेमुळे कल्याणची वैष्णवी पाटील हिची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. यापुढे स्पर्धा महिलांच्या स्पर्धेमध्ये मोठा प्रतिसाद मिळणार असून पुढेही महिलांच्या हिंदकेसरी पंजाब केसरी या स्पर्धा सुरू होतील अशी आशा कुस्ती प्रेमी करत आहेत.

कल्याणजवळील मांगरूळ गावची पैलवान म्हणून नावारूपास आलेली वैष्णवी पाटील नांदिवली येथील जय बजरंग कुस्ती प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षक पंढरीनाथ ढोणे, सुभाष ढोणे, प्रज्वल ढोणे, वसंत साळुंखे व अन्य वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. लहानपणापासूनच कुस्तीची आवड आणि आतापर्यंत सहा ते सात राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारी वैष्णवी पाटील महाराष्ट्र केसरीच्या पहिल्या स्पर्धेमध्ये पोहचली. वैष्णवी पाटील हिचे वडील दिलीप पाटील आणि आई पुष्पा पाटील यांचाही घरामधून पहिल्यापासूनच कुस्ती-पैलवानकीकडे ओढा होता. राज्य-राष्ट्रीय स्तरापर्यंत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मुलीला नेण्याचे त्यांनी बाळगलेले स्वप्न मला पूर्ण करायचे असून महाराष्ट्र केसरी ह्या स्पर्धेपर्यंतच न थांबता मला आंतरराष्ट्रीय आणि ऑलम्पिकपर्यंत मजल मारायची आहे, असे वैष्णवीने सागितले.

जय बजरंग कुस्ती प्रशिक्षण केंद्र नांदिवली येथे सर्व मल्ल माती आखाडा कुस्ती प्रशिक्षण घेत असताना सध्याची परिस्थिती पाहता आणि कुस्ती प्रगत होताना मल्लांना आवश्यक असलेली मॅट कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी कुस्ती केंद्रास उपलब्ध करून दिली. त्यामुळेच त्या मॅटवर कुस्तीचा सराव चालू झाला आणि कल्याण तालुक्यामधील अनेक मल्ल यांनी याचा फायदा घेत अनेक स्पर्धांमध्ये सुयश प्राप्त करू लागले. त्यामधीलच आज महाराष्ट्रमधील पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोचलेली वैष्णवी पाटील हिने मॅट उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार गायकवाड यांचे आभार मानले आहेत.