कल्याणमधून अयोध्या ट्रेनला प्रभू श्रीरामाच्या जयघोषात हिरवा झेंडा

कपिल पाटील यांच्याकडून रामभक्तांना निरोप

कल्याण: भाजपा ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या वतीने श्रीरामाच्या दर्शनासाठी सोडण्यात आलेल्या अयोध्या आस्था विशेष ट्रेनला जय श्रीराम…च्या गजरात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी रात्री हिरवा झेंडा दाखविला. या ट्रेनने १,३४४ भाविक अयोध्येत दर्शनासाठी रवाना झाले.

अयोध्येतील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी जाण्याची इच्छा असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील रामभक्तांसाठी भाजपाने आस्था विशेष ट्रेन आयोजित केली होती. त्यानुसार भिवंडी शहर व ग्रामीण तालुका, मुरबाड, शहापूर आणि कल्याण पश्चिम भागातील १,३४४ भाविकांना घेऊन अपूर्व जल्लोषात ट्रेनला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. कल्याण रेल्वे स्थानकातून काल रात्री बाराच्या सुमारास आस्था ट्रेन रवाना झाली.

यावेळी जय श्रीराम, वंदे मातरम, जय सियाराम, भारतमाता की जय च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह माजी खासदार जगन्नाथ पाटील, भाजपाचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मधुकर मोहपे, कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, कल्याण शहराध्यक्ष वरूण पाटील, जितेंद्र डाकी आदी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेचे नियोजन जितेंद्र डाकी यांनी केले आहे.