कल्याण : एमसीएचआयच्या गृह प्रदर्शनामुळे एकाच छताखाली ग्राहकाला सर्व गोष्टी उपलब्ध होत असून शहराच्या विकासात एमसीएचआयचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
क्रेडाय एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनिटच्या वतीने कल्याण मधील फडके मैदानात १३ व्या गृह प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी उपस्थितांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, एमसीएचआयचे अध्यक्ष भरत छेडा, रवी पाटील, थारवानी इन्फ्रास्ट्रक्चरचे एमडी मोहन थारवानी आदी मान्यवर उपस्थित होते. थारवानी समूहाच्या वतीने यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितले कि, स्वप्नांतले घर शोधायला माणसे इकडे तिकडे फिरत असतात, मात्र या ठिकाणी गृहप्रकल्प आहेत, बँका आहेत, कर्ज घेणारे आहेत, कर्ज देणारे देखील आहेत. यामुळे घराच्या शोधासाठी असणाऱ्या लोकांना एकाच छताखाली सर्व बाबी उपलब्ध होतात. दरवर्षी नियोजनबद्ध एक्सपोचे आयोजन केले जाते. मुंबई ठाण्यानंतर विकसित होणारे शहर कल्याण असून एमसीएचआयच्या माध्यमातून केवळ घरे बांधून ग्राहकांना विकून फक्त पैसे न कमवता शहराच्या विकासात देखील एमसीएचआयचे योगदान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
शासनाच्या वतीने शहरात मोठे रस्ते केले जात असून, पूल बांधले जात आहेत, सुशोभीकरण सुरू आहे. दुर्गाडीचे पूल केले, शिळफाटा ते कोनगांवपर्यंत डबल डेकर एलिवेटेड रस्ता करणार आहोत. रिंग रोड आहे. असे अनेक प्रकल्प आहेत. एमएमआर रिजनमध्ये विकासाला संधी आहे. नीति आयोगाद्वारे एमएमआर रिजनमध्ये एक मिलियन डॉलरच्या विकासकामांना संधी आहे. बाहेरच्या देशातील उद्योजक देखील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पसंती देत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असून कल्याण-डोंबिवलीत देखील क्लस्टरची आवश्यकता आहे. विकासकांनी एक एक क्लस्टर प्रकल्प घ्यावे. सरकार आपल्याला पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. नागरिकांना स्वस्त दरात घरे द्यायची असल्यास विकासकांना सोयी सुविधा देणे गरजेचे आहे. यासाठी सरकार सर्व सामान्य लोकांना कसा फायदा होईल यासाठी निर्णय घेत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.