लोक अदालतीत कडोंमपाचे ‘कल्याण’

थकबाकीदार करदात्यांनी केला साडेचार कोटींचा भरणा

कल्याण : महापालिकेचा कोट्यवधींचा कर थकवणाऱ्या नागरिकांनी अखेर राष्ट्रीय लोक अदालतीत सुमारे साडेचार कोटींचा कर भरणा केल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या आदेशानुसार सन २०२३मधील चौथी राष्ट्रीय लोक अदालत शनिवारी आयोजित करण्यात आली होती.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील ११८९४ थकीत मालमत्ता करदात्यांच्या दावा दाखल पुर्व प्रकरणाच्या नोटीसा सही शिक्‍क्यासह संबंधित प्रभागामार्फत संबंधितांस वाटप करण्यास देण्यात आल्या होत्या. दावा दाखल पूर्व प्रकरणांपैकी १९४१ थकीत मालमत्ता करदात्यांनी मालमत्ता करापोटी येणे असलेली रक्कम महापालिकेकडे जमा केली असून, एकूण रक्कम रु. ४.४८ कोटी इतकी वसूल झाली आहे.

सर्व थकीत मालमत्ता करदात्यांनी मालमत्ता करांची थकीत रक्कम तत्काळ भरुन, महापालिकेस सहकार्य करावे व विकासाला हातभार लावावा, असे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.