कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळीत २० हजार रुपये बोनस मिळणार असल्याची माहिती परिवहन कर्मचारी कामगार संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांनी दिली आहे.
दरवर्षी कडोंमपा कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून बोनस दिला जातो. यावर्षी २५ हजार रुपये बोनस देण्यात यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने कडोंमपा आयुक्तांकडे करण्यात आली होती. या मागणीवर मंगळवारी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांनी चर्चा केली. गेल्यावर्षी १९ हजार ५०० रुपये बोनस दिला गेला होता. यंदा कामगार संघटनेच्या मागणीनुसार २५ हजार रुपये बोनस देता येणार नाही. त्यामुळे यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत बोसनमध्ये ५०० रुपयांची वाढ करुन प्रत्येक कर्मचाऱ्याला २० हजार रुपये बोनस दिला जाणार असल्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे. महापालिका कर्मचारी, परिवहन कर्मचारी आणि शिक्षक अशा एकूण ६,५०० जणांना या बोनसचा लाभ मिळणार आहे.