एपीएमसी बाजारात जुन्नर हापूस हंगामाला सुरुवात

नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात जुन्नर हापूसच्या मुख्य हंगामाला सुरुवात झाली आहे. बाजारात आता आवक वाढली असून सात हजार ते आठ हजार पेट्या दाखल होत असून, प्रति डझन ३५० ते ७०० रुपयांनी विक्री होत आहे.

जून अखेरपर्यंत जुन्नर हापूस हंगाम सुरू राहील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. कोकणातील हापूसचा हंगाम संपताच जूनच्या सुरुवातीलाच जुन्नर हापूसच्या हंगामाला सुरुवात होते. एपीएमसी बाजारात सध्या कोकणातील हापूस हंगाम संपला असून राज्याबाहेरील आंब्याची आवक सुरू झाली आहे. बाजारात केशर, निलम, तोतापुरी, बलसाड आंबे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर जुन्नरचा हापूस बाजारात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. बाजारात हापूस आवक वाढण्यास सुरुवात झाली असून, सोमवारी बाजारात सात हजार ते आठ हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. यंदा अवकाळी पावसाने सर्व प्रकारच्या आंब्यांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. यंदा जुन्नर हापूसचे ३५ ते ४० टक्के उत्पादन आहे. बाजारात जुन्नर हापूस प्रतिडझन ३५० ते ७०० रुपयांनी विक्री होत असून, जून अखेरपर्यंत हंगाम असेल, अशी माहिती व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.