चेन्नई: जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपालांनी विजय यांना मुख्यमंत्री आणि गोपनियतेची शपथ दिली. सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडीनंतर जोसेफ विजय यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
यावेळी अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिची उपस्थिती लक्षवेधी ठरली. जोसेफ विजय यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी त्रिशा कृष्णन हिने खास दाक्षिणात्य लूक केला होता.
चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांचा शपथविधी सोहळा पडला. या सोहळ्यासाठी राजकीय नेत्यांसह सिनेविश्वातील कलाकारांनी उपस्थिती लावली. या सगळ्यात अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या उपस्थितीची चर्चा रंगली आहे. जोसेफ विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना त्रिशा कृष्णन आवर्जून उपस्थित राहिली. विजय यांच्या राजकीय यशाचा आनंद त्रिशाच्या चेहऱ्यावर झळकत होता. तिने उपस्थितांना अभिवादन करताच सभागृहामध्ये एकच उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले.
जोसेफ विजय यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अभिनेत्री त्रिशा कृष्णनने खास लूक केला. दक्षिण भारताच्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि अभिजात वारशाचे प्रतीक मानली जाणारी आकर्षक रेशमी साडी तिने नेसली आहे. आकाशी निळ्या रंगासह गोल्डन काठ असलेल्या या साडीमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलले होते.यासह जरतारीचा ब्लाऊज तिने स्टाईल केला होता. याचबरोबर त्रिशाने लाल डायमंड नेकलेस परिधान केला होता. तसेच केसांमध्ये माळलेला गजरा आणि कपाळावरील टिकली उठून दिसत होती. तिच्या साधेपणामध्ये तिचे सौंदर्य उठून दिसत आहे. सोशल मीडियावर तिच्या या लूकची चर्चा होताना दिसत आहे.
तमिळनाडूच्या निवडणुकांमध्ये जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाने विजयश्री खेचून आणली. ४ मे रोजी निवडणुकांचा निकाल हाती आला आणि विजय यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला. आश्चर्यकारक बाब म्हणजे याच दिवशी अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिचा ४३ वा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या खास दिवशीच विजय यांनी खास मैत्रीण त्रिशाला तमिळनाडूचा भव्य निकाल भेट दिल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली. निकालाच्या दिवशीदेखील विजयच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी त्यांच्या चेन्नईच्या निवासस्थानी दाखल झाली होती. निवडणुकांच्या निकालानंतर त्रिशा कृष्णन ही चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.