पावसाने झोडले, भाज्यांनी रडवले

पालेभाज्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

ठाणे: मुसळधार पावसाने मराठवाडा, पुणे, संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल झाला आहे. या पावसामुळे भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले असून आवक घटली आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये सर्वच भाज्यांचे भाव वाढले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे बाजार समितीमध्ये भाज्यांचे भाव गगनाला भिडले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ठाण्यातील बाजार पेठांमध्ये भाज्यांची आवक कमी झाली आहे. पावसामुळे खराब भाज्या येत असल्याने काही भाज्यांचे दर १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. यामध्ये मेथी, कांद्याची पात, माठ, अळूची पाने, कोथिंबीर, फ्लॉवर, कोबी यांसह इतर भाज्यांचे दर वाढले आहेत. या दरवाढीमुळे व्यापाऱ्यांना व सामान्य नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पुढील आठवडाभर बाजारात आवक कमी राहणार असून, दर 10 ते 20 रुपयांनी किलोमागे वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

ठाण्यातील बाजार पेठांमधील भाज्यांचे आधीचे दर

मेथी 40 रु.जुडी, शेपू 30 रु. जुडी, कोथिंबीर 30 रु. जुडी, पालक 20 रु. जुडी, कांद्याची पात 20 रु. जुडी, वांगे 25 रु. अर्धा किलो, फ्लॉवर 40 रु. नग, पत्ताकोबी 30 रु. नग, भेंडी 40 रु. किलो, कारले 30 रु. किलो, टोमॅटो 60 रु. किलो, शिमला मिरची 30 रु. किलो, लिंबू 20 रु.एक मोठा तर 20 रु.चे 3 छोटे, आले 50 रु.किलो, दुधी भोपळा 60 रु. नग, कांदे 50 रु.किलो, बटाटे 40 रु. किलो, लसूण 60 रु. किलो, काकडी 40 रु.किलो, माठ 20 रु.जुडी, अळूची पाने 20 रु.जुडी

भाज्यांचे सध्याचे दर

मेथी 50 रु.जुडी, शेपू 40 रु. जुडी, कोथिंबीर 40 रु. जुडी, पालक 30 रु. जुडी, कांद्याची पात 30 ते 50 रु. जुडी, वांगे 70 रु. अर्धा किलो, फ्लॉवर 50 रु. नग, पत्ताकोबी 40 रु. नग, भेंडी 40 रु. किलो, कारले 20 रु. किलो, टोमॅटो 70 रु. किलो, सिमला मिरची 40 रु.किलो, लिंबू 10 रु.चे 2 मोठे तर 20 रु. चे 4 छोटे, आले 60 रु.किलो, दुधी भोपळा 40 रु. नग, कांदे 30 रु. किलो, बटाटे 30 रु. किलो, लसूण 50 रु.अर्धा किलो, काकडी 40 रु.किलो, माठ 30 रु. जुडी, अळूची पाने 30 रु.जुडी

मुसळधार पावसामुळे ठाण्याच्या बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी होत असून काही भाज्या सडलेल्या येत आहेत. यामुळ पाले भाज्यांसह इतर भाज्याही भाव खात असून ठाणेकर नागरिकांसह व्यापारी मंडळी देखील त्रस्त झाली आहेत. दरम्यान खराब भाजी पुरवठा, आवक कमी यामुळे भाज्यांचे दर 10 ते 20 टक्क्यांनी वाढले असल्याचे भाजी विक्रेते पटेल यांनी सांगितले.