ठाण्यात घडणाऱ्या गुन्ह्यांची उकल करणार आयपी कॅमेरे

ठाणे : शहरात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर सूक्ष्म नजर ठेवण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीचे फुटेज मिळवून गुन्ह्यांची उकल सहज करण्यासाठी शहरात आयपी कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने ३१ लाख ४१ हजारांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात नगरसेवक निधी आणि वायफायच्या बदल्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामध्ये नगरसेवक निधीतून व इतर माध्यमातून १५९८ आणि वायफायच्या माध्यमातून २५० कॅमेरे शहरात बसविण्यात आले आहेत. सप्टेंबर २०१७ पासून शहराच्या विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. यातून महिलांची सुरक्षा तसेच सोनसाखळी चोरी, अपघात, आदींसह गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी हे कॅमेरे महत्वाचा दुवा ठरतील या उद्देशाने हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दुसरीकडे पालिकेच्याच सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेल्या फुटेजचा फायदा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांना झाला असल्याचेही काही उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे ही सुविधा आणखी अद्ययावत करण्याच्या दृष्टिकोनातून शहरात ठिकठिकाणी आयपी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. यासाठी ३१ लाख ४१ हजारांचा खर्च करण्याचेही नियोजन पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

आयपी कॅमेरे म्हणजे काय?

आयपी केमेरे अर्थात इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरा असा त्याचा अर्थ असून हा एक डिजिटल व्हिडीओ कॅमेरा आहे. सीसीटीव्हीमधील सर्व डेटा रिसिव्ह करून आयपी नेटवर्कच्या माध्यमातून ठाणे महापालिकेच्या हाजूरी येथील डेटा सेंटरला जोडण्यात येणार आहे.