* आमदार संजय केळकर यांचा अधिवेशनात आरोप
* भ्रष्टाचाराची चौकशी सुरू
ठाणे : ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरात जॉगिंग ट्रॅकसह विविध सुधारणा आणि सुशोभीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाला असून कामे ना करताही बिले अदा करण्यात आल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केला. या प्रकरणी नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणी चौकशी सुरू असून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
ठाणे महापालिका क्षेत्रात कोपरी प्रभागात जॉगिंग ट्रॅकसाठी ९८ लाख, स्मार्ट सिटी अंतर्गत दुबार कामांसाठी पाच कोटी ४४ लाख आणि इतर ७२ मंजूर कामांसाठी आठ कोटींचा खर्च दाखवण्यात आला आहे. ही कामे निकृष्ट दर्जाची असून काही कामे अर्धवटच आहेत तर काही कामे झालेली नसताना कंत्राटदारांना कामाचे पैसे अदा करण्यात आले असल्याचे श्री.केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. या कामांबाबत ठामपा आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. याबाबत सभागृहाला अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचा आरोप त्यांनी केला.
एकीकडे मुख्यमंत्री ठाण्यासाठी निधी देत असताना कंत्राटदार आणि अधिकारी विकासकामांच्या नावाखाली लूट करत आहेत. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून एक महिन्यात अहवाल मागवण्याची मागणी श्री.केळकर यांनी केली. तर माहिती चुकीची असल्यास हक्कभंगसारखे आयुध वापरून पुन्हा हाच विषय आपण सभागृहात आणू शकता असा सल्ला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.
सफाई कामगारांसाठी जात पडताळणी नियम शिथिल करा
लाड-पागे समितीच्या अहवालानुसार सफाई कामगारांना वारसा हक्काने नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी या कामी जात पडताळणी संदर्भात १९५० सालचे पुरावे मागितले जातात. ही अट जाचक असून ती शिथिल केल्यास सफाई कामगारांना खऱ्या अर्थाने राज्य सरकारच्या निर्णयाचा फायदा होईल, असे सांगून श्री .केळकर यांनी या बाबतच्या शासन निर्णयाचे शुद्धीपत्रक काढण्याची मागणी केली.