४४ कोटींची ५३ वाहने जप्त, दोघांना अटक
भाईंदर : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून एका टेम्पोच्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू होता. तपासादरम्यान देशभरातील एका मोठ्या अवजड वाहनाच्या चोरीची उकल करण्यात आली आहे. पोलिसांनी मीरारोड ते राजस्थान दरम्यान तीन हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासत ४८ ट्रक, ३ टेम्पो, दोन कार असा ४४ कोटी ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करत दोन आरोपी ताब्यात घेतले आहेत.
राजस्थान, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्रात या राज्यातून २२ गुन्हे पोलिसांनी उघकीस आणले आहेत. तब्बल दोन महिने या गुन्हाचा तपास चालला होता. मीरारोड येथे राहणारे विनय कुमार पाल यांचा डिसेंबर महिन्यात एक टेम्पो रस्त्यावरून चोरीस गेला होता. या संदर्भात त्यांनी काशिमीरा पोलिसांत तक्रार दिली होती. या गुन्ह्यावरून पोलिसांनी अंदाज ही बांधला नसेल की त्यांच्या हाती असे काही लागेल. पण पाल यांच्या टेम्पोच्या तपासात पोलिसांच्या हाती एक आरोपी लागला. त्याच्याकडून पोलिसांना या मागे मोठी टोळी असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी १४ पोलिसांचे पथक तयार केले. हे पथक राजस्थान, गुजरात, हरियाणा राज्यात रवाना केले.
पोलीस तपासात चोरी गेलेल्या एका ट्रकवरील टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी वापरण्यात आलेल्या फास्टटॅगची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याचे तांत्रिक विश्लेषण करत राजस्थानमधील मेवात गावातून फारुख खान आणि मुबीन हारीस याला अटक केली. त्यांनी देशभरातून ५३ ट्रक चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.