पालघरजवळ कार अपघातात आंतरराष्ट्रीय नेमबाजाचा मृत्यू

पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील यांचा मृत्यू झाला असून या अपघातामध्ये कार चालक जखमी झाला आहे. अपघात प्रकरणी कार चालकाविरोधात मनोर पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दुर्वेस येथील हेरिटेज डेअरीसमोर सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास गुजरात दिशेला जाणारी भरधाव वेगातील फॉर्च्यूनर कार ( बी.आर. 05 पी.बी.5055) चालकाचे नियंत्रण सुटून पुढील अवजड वाहनाला धडकली. या भीषण अपघातामध्ये कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.

अपघात इतका भीषण होता की कारचालकाच्या शेजारी बसलेले आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील (27) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक यश प्रसाद चौधरी (23) हा किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुणे येथून कारने अहमदाबाद येथे प्रशिक्षणासाठी जात असताना हा अपघात झाला. अपघातास कारणीभूत कार चालकाविरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजपटूच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील बालेवाडी क्रीडा संकुल येथे क्रीडा अधिकारी (गट-ब) म्हणून कार्यरत होते. अहमदाबाद येथे प्रशिक्षणासाठी जात असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सन 2018 मध्ये 53 व्या ऑल इंडिया रेल्वे शूटिंग स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक त्यानंतर सन 2019 मध्ये 54 व्या ऑल इंडिया रेल्वे शूटिंग स्पर्धेत सहभागी होताना वैयक्तिक २५ मीटर शूटिंग स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक, सन 2020 मध्ये पुणे येथे झालेल्या मध्य रेल्वे आयोजित चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. त्यांनी राज्यपातळीवरील स्पर्धेसोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता.