ठाण्यात उभे राहणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स क्लब

ठाणे : दादोजी कोंडदेव क्रिडागृहात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि आयपीएलचे सामने व्हावेत या उद्देशाने पालिकेने आणखी एक पाऊल उचलले आहे. जवाहरबाग परिसरात सुमारे तीन हजार चौरस मीटर मोकळ्या भुखंडावर पीपीपी तत्वावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स क्लब उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दादोजी कोंडदेव क्रिडागृह संकुल सुमारे ३८,४२० चौरस मीटर क्षेत्रात विकसित करण्यात आले आहे. मागील काही महिन्यात या क्रिडागृहाने कात टाकण्यास सुरवात केली आहे. त्यापुढे जाऊन आता याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने व्हावेत तसेच आयपीएलचे देखील सामने व्हावेत आणि या स्टेडीअमची पांढरा हत्ती म्हणून असलेली ओळख पुसली जावी या उद्देशाने आता महापालिकेने पावले उचलली आहेत. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्टस क्लब, तसेच याच ठिकाणी प्रेस क्लब, व्हीआयपी गॅलरी, बँक्वेट, निवासी व्यवस्था, स्विमिंग पुल, जिम्नॅशियम, बीझनेस सेंटर सुविधा व या एकत्रित सुविधांचे मुख्य प्रेक्षागृहाशी संलग्नता नाही. त्यामुळे याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने होऊ शकत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता या सर्व सुविधांसह सुसज्ज अशी इमारत क्रिडा प्रेक्षागृहाच्या दक्षिणेकडील जवाहरबाग परिसरात सुमारे तीन हजार चौरस मीटर मोकळ्या भुखंडावर नियोजित करण्यात आली आहे. नियोजित इमारत ही जवाहरबाग रस्त्यालगत असलेल्या विकास योजनेतील पार्कींग आरक्षणाशी संलग्न करणे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पोर्ट्स क्लब इमारतीस स्वतंत्र पार्कींगची व्यवस्था देखील होऊ शकणार आहे.

खाजगी लोक सहभाग तत्वावर ही योजना राबवणे व्यवहार्य ठरणार असल्याचे पालिकेने तयार केलेल्या प्रस्तावात नमुद केले आहे. त्यानंतर ही इमारत लीजवर देण्याचाही पालिकेचा विचार आहे. त्यासाठी महापालिकेला कोणत्याही स्वरुपाचा भांडवली खर्च देखील नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार या कामी सल्लागार नेमला जाणार आहे.