भारताची नजर न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकण्याकडे

अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ५९ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत दमदार सुरुवात केली. नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिने संघाचे नेतृत्व केले.

प्रथम फलंदाजी करताना भारताने ४४.३ षटकात २२७ धावा नोंदवल्या. भारतासाठी आपला पहिला सामना खेळणाऱ्या तेजल हसबनीसने ६४ चेंडूत ४२ धावा केल्या. ती संघाची सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. आणखी एक नवोदित खेळाडू सायमा ठाकोर हिनेही प्रभावित केले. या मध्यमगती गोलंदाजाने सात षटकांत २६ धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. मात्र, अष्टपैलू दीप्ती शर्माने बॅट आणि चेंडूने उत्कृष्ट योगदान देऊन सामनावीराचा पुरस्कार जिंकला. दीप्तीने ५१ चेंडूत ४१ धावा केल्या आणि नंतर नऊ षटकात ३५ धावा देऊन एक विकेट घेतली.

या मालिकेत आणखी दोन एकदिवसीय सामने बाकी असल्याने पाहुण्यांचा संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंडसाठी ही खूप महत्वाची एकदिवसीय मालिका आहे कारण त्यांना पुढील वर्षी भारतात खेळल्या जाणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषकासाठी थेट पात्र होण्यासाठी जास्तीत जास्त सामने जिंकणे गरजेचे आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

 

आमने-सामने

भारत आणि न्यूझीलंडने एकमेकांविरुद्ध ५५ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने २१ जिंकले आहेत आणि न्यूझीलंडने ३३ जिंकले आहेत. भारतात खेळल्या गेलेल्या २१ एकदिवसीय सामन्यांपैकी भारताने ११ आणि न्यूझीलंडने नऊ जिंकले आहेत.

संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दयालन हेमलता, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), उमा चेत्री (यष्टीरक्षक), सायली सातघरे, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, तेजल हसबनीस, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा, राधा यादव, श्रेयंका पाटील

न्यूझीलंड: सोफी डीव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, लॉरेन डाउन, इझी गेज (यष्टीरक्षक), मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, पॉली इंग्लिस (यष्टीरक्षक), फ्रॅन जोनास, जेस कर, अमिलिया कर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हॅना रो, लीआ तहुहू

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

राधा यादव: भारताच्या या डावखुऱ्या फिरकीपटूने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कमालीचे प्रदर्शन केले. तिने ८.४ षटकात ३५ धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. तिने तब्बल ३० निर्धाव चेंडू फेकले. तिने किफायतशीर गोलंदाजी केली.

जेमिमाह रॉड्रिग्स: भारताच्या या उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तिच्या ३६ चेंडूत ३५ धावांच्या खेळीत धैर्य दाखवले. तिने हसबनीससोबत ६१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली आणि भारताला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यास मदत केली.

अमिलिया कर: न्यूझीलंडच्या या चमकदार अष्टपैलू खेळाडूने भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात चेंडूने शानदार प्रदर्शन केले. तिने नऊ षटकांत एका निर्धाव षटकासह ४२ धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. फलंदाजीत ती २३ चेंडूत २५ धावा करत नाबाद राहिली.

ब्रुक हॅलिडे: न्यूझीलंडच्या या डावखुऱ्या मधल्या फळीतील फलंदाजाने भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५४ चेंडूत ३९ धावा केल्या. ती तिच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. तिची खेळीत चार चौकारांचा समावेश होता.

 

हवामान

दुपारी तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. नंतर सायंकाळी तापमान २८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे वातावरण थोडे आनंददायी होईल.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ऑक्टोबर २७, २०२४

वेळ: दुपारी १:३० वाजता

स्थळ: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

प्रसारण: स्पोर्ट्स १८ नेटवर्क,जिओ सिनेमा ऍप