पाकिस्तानला पुरविली गुप्त माहिती
मेरठ: उत्तर प्रदेशमधील दहशतवादी विरोधी पथकाने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या एका कर्मचाऱ्याला उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे अटक केली आहे. हा कर्मचारी रशियाची राजधानी मॉस्कोमधील भारतीय दूतावास कार्यालयात कार्यरत असताना त्याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेसाठी काम केले, असा आरोप त्यावर ठेवण्यात आला आहे.
सत्येंद्र सिवल असे नाव असलेल्या कर्मचाऱ्याने २०२१ साली मॉस्कोमधील दूतावासात काम केले होते. सत्येंद्र सिवलने भारतीय लष्कर आणि काही गुप्त धोरणांची माहिती पाकिस्तानला दिली, असे चौकशीतून समोर आले आहे.
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने सत्येंद्र सिवलला हनी ट्रॅपच्या माध्यमातून जाळ्यात ओढले, असे सांगितले जाते. त्यानंतर पाकिस्तानच्या इशाऱ्यावर त्याने भारताशी निगडित गुप्त माहिती पुरविण्याचे काम केले. एवढेच नाही तर सत्येंद्र सिवल इतर कर्मचाऱ्यांनाही या हेरगिरीच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. उत्तर प्रदेश एटीएससह आता केंद्रीय तपास यंत्रणाही सत्येंद्र सिवलची चौकशी करत आहेत. या चौकशीतून आणखी माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे.
एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉस्कोमध्ये तैनात असताना सत्येंद्र सिवल फेसबुकच्या माध्यमातून एका महिलेच्या संपर्कात आला. तिथून मेसेंजरच्या माध्यमातून त्यांच्यात संवाद सुरू झाला. त्यानंतर मोबाइल नंबर एकमेकांना देऊन व्हॉट्सअपवर त्यांचे बोलणे होऊ लागले. हनी ट्रॅप करणाऱ्या महिलेने स्वतःला रिसर्चर असल्याचे सांगून सिवलकडून माहिती मिळवली. या गुप्त माहितीच्या बदल्यात पैशांचेही आमिष सिवलला दाखविण्यात आल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
उत्तर प्रदेश एटीएसच्या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे गुप्तचर त्यांच्या हस्तकांमार्फत भारतीय परराष्ट्र मंत्रालयातर्फे दूतावासात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पैशांचे आमिष देऊन भारतीय लष्कर आणि गुप्त धोरणांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी गुप्तवार्ता खात्रीलायक सूत्राकडून मिळाली. या माहितीच्या आधारे एटीएसने तपास सुरू केला. इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स करून आणि पुरावे गोळा केल्यानंतर सत्येंद्र सिवलचा माग काढण्यात आला. सिवल हा उत्तर प्रदेशच्या हपूर जिल्ह्यातील रहिवासी असून तो परराष्ट्र मंत्रालयातील बहुउद्देशिय कर्मचारी विभागात काम करतो.