नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी विशाखापट्टणममधील राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर सहा गडी गमावून 336 धावा केल्या.
भारताचा सलामीचा फलंदाज, यशस्वी जैस्वाल हा त्याच्या संघासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू ठरला. या डावखुऱ्या फलंदाजाने 257 चेंडूत 17 चौकार आणि पाच षटकारांसह शानदार 179 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने त्याच्या मागील सर्वाधिक धावसंख्येचा टप्पा ओलांडला (जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध रोसेओ येथे त्याने 171 धावा केल्या होत्या) आणि त्याच्या कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्तम स्कोर नोंदवला.
कर्णधार रोहित शर्मा (14) सोबत जैस्वालने 40 धावांची सलामी भागीदारी रचली आणि भारताला स्थिर सुरुवात करून दिली. परंतु ही भागीदारी तोडण्यात ऑफ स्पिनर शोएब बशीर, जो आपली पहिली कसोटी खेळात होता, याला यश मिळाले. त्याने शर्माला बाद केले.
नंतर, पहिल्या कसोटीपेक्षा चांगली कामगिरी करणारी भारताची मधली फळी प्रभावित करू शकली नाही. शुभमन गिल (34), श्रेयस अय्यर (27), आणि आपला पहिला कसोटी सामना खेळणारा रजत पाटीदार (32) यांनी चांगली सुरुवात केली पण त्यांना मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. 41 वर्षीय जेम्स अँडरसनने (1/30) गिलला तंबूत पाठवून कसोटी सामन्यांमधला आपला 691 वा बळी घेतला तर फिरकी गोलंदाज टॉम हार्टले (1/74) आणि रेहान अहमद यांनी अनुक्रमे अय्यर आणि पाटीदार यांना बाद केले.
बशीरला दिवसातील त्याची दुसरी विकेट (2/100) अक्षर पटेलच्या रूपात मिळाली. जैस्वाल आणि पटेल यांच्यात पाचव्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी झाली आणि लगेचच बशीरने पटेलला (27) बाद केले. पटेल मागोमाग भारताने त्यांची सहावी विकेट गमावली जेव्हा अहमदने (2/61) यष्टिरक्षक-फलंदाज श्रीकर भरतला (17) एका सामान्य लाईन आणि लेन्थ असलेल्या चेंडूवर फसवले.
दिवसाच्या अखेरच्या षटकांत रविचंद्रन अश्विन (नाबाद 5) यांनी जैस्वाल याच्याशी हातमिळवणी केली. 300 हून अधिक धावा आणि चार विकेट हातात असताना भारत, शनिवारी, दुसऱ्या दिवसाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने करेल.