हैदराबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 365 धावा आणि 11 विकेट्स अशी आकडेवारी होती. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स, ज्याने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन फिरकीपटू खेळवले होते, त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने चांगला टॉस जिंकला कारण ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करणारी आहे म्हणून जो संघ शेवटी फलंदाजी करेल त्यांना खेळी करणे अवघड जाऊ शकते.
इंग्लंड संघ, जो अलीकडच्या काळात, बाझबॉल क्रिकेट खेळण्यासाठी प्रसिद्ध झाला आहे त्याने खेळाची सुरुवात धमाकेदार केली. झॅक क्रॉली आणि बेन डकेट या त्यांच्या सलामीच्या जोडीने प्रत्येक षटकात सुमारे पाच धावा ठोकून झटपट 55 धावा केल्या. परंतु त्यांची भागीदारी रविचंद्रन अश्विनने त्याच्या स्पेलच्या दुसऱ्या षटकात मोडली. त्याने डकेटला (35) लेग बिफोर विकेट बाद केले. ऑली पोप (1) आणि क्रॉली (20) अनुक्रमे रवींद्र जडेजा आणि अश्विन (3/68) चे बळी ठरले. एका मागोमाग एक विकेट्स गेल्याने इंग्लंड अचानक 55/0 वरून 60/3 झाला.
डाव स्थिरावण्यासाठी पाहुण्यांना भागीदारीची गरज होती. इंग्लंडचा सर्वात अनुभवी कसोटी फलंदाज आणि या संघातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू जो रूट याने जॉनी बेअरस्टोसोबत हात मिळवणी करत चौथ्या विकेटसाठी 61 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. तथापि, चांगली सुरुवात केल्यानंतर, भारताच्या डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाजांनी त्यांना तंबूत परत पाठवले. जडेजाने (3/88) रूटची (29) विकेट घेतली तर अक्षर पटेलने (2/33) बेअरस्टोला (37) बाद केले.
125 धावांवर आपली अर्धी बाजू गमावल्यानंतरही इंग्लंडचा कर्णधार क्रीजवर असल्याने त्यांना एक चांगली धावसंख्या उभी करण्याची अपेक्षा होती. या आक्रमक डावखुऱ्या फलंदाजाने 88 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 70 धावांची जबाबदार खेळी केली. त्याला टॉम हार्टले (23) मध्ये एक सक्षम सहयोगी सापडला, ज्याने आपल्या कर्णधाराला उत्तम साथ दिला. अखेरकर जसप्रीत बुमराहने (2/28) अंतिम विकेट घेतल्याने इंग्लंडचा डाव 246 धावांवर संपुष्टात आला.
दिवसातील सुमारे 25 षटकांचा खेळ शिल्लक असताना, कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या भारताच्या सलामीच्या जोडीने शानदार फटकेबाजी करून फलंदाजीची सुरुवात केली. मुंबईच्या या दोन फलंदाजांनी 12.2 षटकांत 80 धावा केल्या. भारताला पहिला झटका जॅक लिचने दिला जेव्हा त्याने शर्माला (24) एक चुकीचा शॉट खेळण्यास भाग पाडले. तथापि, जैस्वाल (70 चेंडूत नाबाद 76) आक्रमक खेळत राहिला आणि आपले दुसरे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. दुसरीकडे शुभमन गिलने शांतपणे 43 चेंडूत 14 धावा केल्या. भारताने एक गडी गमावून 119 धावा केल्या असून 127 धावांनी पिछाडीवर आहे.