डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारतीय महिलांनी शनिवारी इंग्लंडच्या महिला संघावर 347 धावांनी मात करून ऐतिहासिक विजय नोंदवला. महिलांच्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध मायदेशात भारताचा हा पहिला विजय होता आणि आजपर्यंत त्यांनी एकमेकांविरुद्ध खेळलेल्या १२ कसोटींपैकी तिसरा विजय होता.
पहिल्या डावात भारताने दीप्ती शर्मा, यस्तिका भाटिया आणि कसोटीत डेबू करणाऱ्या शुभा सतीश आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 428 धावा केल्या. फलंदाजांप्रमाणेच, गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली आणि त्यांनी इंग्लंडला 136 धावांत गुंडाळले. शर्माने बॉलसह पाच बळी घेतले आणि तिला स्नेह राणाने दोन विकेट्स पटकावून चांगली साथ दिली.या दोन्ही गोलंदाजांनी आपल्या फिरकीचा कमल दाखवला.
फॉलोऑनची अंमलबजावणी न केल्याने भारताने पुन्हा फलंदाजी करत 292 च्या विद्यमान आघाडीवर आणखी 186 धावांची भर घातली आणि 479 धावांचे मोठे लक्ष्य इंग्लंड समोर ठेवले. पहिल्या डावात जसे निराशाजनक प्रदर्शन इंग्लंडच्या फलंदाजाने केले तसेच काही त्यांनी पुन्हा केले. या खेळपट्टीवर फिरकीपटूंनी पुन्हा एकदा भारतासाठी चांगली कामगिरी केली कारण त्यांनी इंग्लंडला तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात 131 धावांवर बाद केले. शर्माने चार आणि वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकरने तीन बळी घेऊन इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने बॅट आणि बॉलसह उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सामनावीराचा पुरस्कार जिंकला. भारत-इंग्लंड मालिका संपन्न झाली असून इंग्लंडने टी-20 सामने 2-1 अशा फरकाने जिंकून गाजवले तर भारताने कसोटी जिंकून त्या टी-२० मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला.