2023 नंतर पहिल्यांदाच भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ टी-20 मालिकेसाठी आमने-सामने येणार आहेत. 2023मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडने 2-1 ने बाजी मारली होती. विशेष म्हणजे, भारतीय महिला क्रिकेट संघाने आजवर कधीही इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकलेली नाही. आता 2025मध्ये जेव्हा हे दोन संघ 28 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेत भिडतील, तेव्हा भारताकडे एक नवा अध्याय लिहिण्याची आणि इतिहास रचण्याची सुवर्ण संधी आहे.
आमने-सामने
भारत आणि इंग्लंडने एकमेकांविरुद्ध एकूण 30 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. त्यापैकी इंग्लंडने 22 तर भारताने केवळ 8 सामने जिंकले आहेत. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांत इंग्लंड 8-4 ने आघाडीवर आहे.
संघ
इंग्लंड: नॅटली सिव्हर-ब्रंट (कर्णधार), एम अर्लॉट, टॅमी बोमाँट (यष्टीरक्षक), लॉरेन बेल, अॅलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डन्कली, सोफी एक्लस्टन, लॉरेन फायलर, एमी जोन्स (यष्टीरक्षक), पेज शोलफिल्ड, लिंसी स्मिथ, डॅनी वायट-हॉज, इस्सी वाँग
भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हर्लिन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सातघरे
कोणत्या खेळाडूंवर लक्ष असेल
नॅटली सिव्हर-ब्रंट: ही इंग्लंड संघाची कर्णधार व दमदार अष्टपैलू खेळाडू आहे. या 32 वर्षीय खेळाडूकडे 135 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळण्याचा अनुभव आहे. या उजव्या हाताच्या फलंदाजाने 2881 धावा केल्या आहेत. तसेच उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करत तिने 90 विकेट्स पटकावल्या आहेत.
अॅलिस कॅप्सी: ही 20 वर्षीय इंग्लंडची उदयोन्मुख आणि प्रभावी अष्टपैलू खेळाडू आहे. तिने 41 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांत 711 धावा ठोकल्या आहेत. त्याचबरोबर ऑफ स्पिन गोलंदाजी करून तिच्या नावावर 6 विकेट्सदेखील आहेत.
स्मृती मानधना: भारताची ही उपकर्णधार आणि सलामीवीर आहे. महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये ती सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 142 डावांत या डावखुऱ्या फलंदाजाने तब्बल 3761 धावांचा अविरत डोंगर रचला आहे.
रिचा घोष: भारताची ही यष्टीरक्षक फलंदाज तिच्या आक्रमक शैलीमुळे जगातील अव्वल दर्जेची ‘फिनिशर’ म्हणून ओळखली जाते. ती 142च्या सणसणीत स्ट्राइक रेटने फटकेबाजी करते. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये ती 1000 धावांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे.
सामन्याची थोडक्यात माहिती
दिनांक: 28 जून 2025
वेळ: सायंकाळी 7:00 वाजता
ठिकाण: ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
प्रक्षेपण: Sony LIV, Fan Code