३९ वर्षांनंतर वानखेडे स्टेडियमवर होणार आंतरराष्ट्रीय महिला कसोटी सामना; डिसेंबर २१ ते २४ दरम्यान भारत वि. ऑस्ट्रेलिया

Photo credits: cricket.com.au

भारतीय महिला संघाला १० दिवसात दोन कसोटी सामने खेळायला मिळणे हे आपल्या देशातील महिला क्रिकेटसाठी आणि त्याचबरोबर जागतिक महिला क्रिकेटसाठी सकारात्मक चिन्ह आहे. नवी मुंबईतील डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे भारताने इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळली आणि ३४७ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. तसेच मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटीत भारताचा महिलांचा हा पहिला विजय ठरला. भारत आणि इंग्लंडमध्ये खेळले गेलेल्या १२ कसोटी सामन्यांपैकी भारताने तीन तर इंग्लंडने केवळ एक जिंकला आहे.

इंग्लंड मालिकेनंतर हरमनप्रीत कौर आणि तिचे सहकारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायला तयार आहेत. जरी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही कसोटी जिंकलेली नसली तरी इंग्लंडविरुद्ध मिळवलेल्या शानदार यशाने प्रचंड आत्मविश्वास घेऊन भारतीय महिला क्रिकेट संघ मैदानावर उतरेल.

 

संघ

ऑस्ट्रेलिया: अ‍ॅलिसा हिली (कर्णधार, यष्टिरक्षक), ताहलिया मॅकग्रा (उपकर्णधार), डार्सी ब्राउन, लॉरेन चीएटल, हेदर ग्रॅहम, ऍशले गार्डनर, किम गार्थ, जेस जोनासेन, अलाना किंग, फीबी लिचफील्ड, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शुट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहॅम

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, शुभा सतीश, हरलीन देओल, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर

 

कसोटी क्रिकेटमध्ये आमने सामने

भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांविरुद्ध 10 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यापैकी ऑस्ट्रेलियाने चार जिंकले आहेत आणि सहा सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. या दोन संघांची शेवटची भेट २०२१ मध्ये कारारा येथे झाली होती. सामना अनिर्णीत संपला तरी, भारताने पहिल्या डावात ३७७ धावा केल्या, जी भारत-ऑस्ट्रेलिया महिला कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे.

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

जेमिमाह रॉड्रिग्स: मुंबईच्या या फलंदाजाने गेल्या आठवड्यात इंग्लंडविरुद्ध खेळताना कसोटीमध्ये डेबू केला. या उजव्या हाताच्या फलंदाजाने दोन डावात एक अर्धशतकासह सर्वाधिक ९५ धावा केल्या. तिने इंग्लंडच्या फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांविरुद्ध सहजतेने खेळी केली. याशिवाय, क्षेत्ररक्षण करताना शॉर्ट लेग आणि सिली पॉईंटवर तिने उत्कृस्ट कामगिरी केली.

दीप्ती शर्मा: या भारतीय अष्टपैलूने डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध संस्मरणीय खेळी केली होती. ऑफस्पिन गोलंदाजी करत तिने नऊ विकेट्स घेतल्या, ज्यात एक फायफर आणि एक फोरफरचा समावेश होता. ती कसोटीत सर्वात जास्त विकेट्स घेणारी गोलंदाज ठरली. फलंदाजी करताना तिने एका अर्धशतकासह दोन डावात ८७ धावा केल्या.

एलिस पेरी: ही ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ११ कसोटी सामन्यांसह संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. तिच्या नावावर ८७६ धावा आहेत ज्यात एका द्विशतकाचा समावेश आहे. त्याचबरोबर माध्यम गतीने गोलंदाजी करून तिने ३८ विकेट्स पटकावल्या आहेत. जून २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत, या उजव्या हाताच्या वरच्या फळीतील फलंदाजाने १२४ धावा ठोकल्या आणि एक विकेट देखील घेतली.

ऍशले गार्डनर: ही २६ वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळाच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये मॅच विनर आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत तिने सामनावीराचा पुरस्कार पटकावला. या उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने ४१ धावा केल्या आणि ऑफ स्पिन गोलंदाजी करत १२ बळी घेतले. ती महत्त्वाची भूमिका बजावेल, विशेषत: चेंडूसह, जसा सामना पुढे जाईल आणि खेळपट्टी फिरकी गोलंदाजांची अनुकूल होईल.

 

खेळपट्टी आणि परिस्थिती

या ठिकाणी फक्त एक महिला कसोटी आयोजित केली गेली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९८४ मध्ये तो सामना खेळला गेला होता. सामना अनिर्णीत संपला. अलीकडेच, या मैदानावर भारत-इंग्लंड महिलांच्या टी-२० मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्ट्या लाल मातीच्या आहेत. सामान्यत: लाल मातीच्या खेळपट्ट्या मंद आणि कमी उसळी देतात, जे फिरकीपटूंसाठी अनुकूल असते. तथापि, दररोज सकाळी खेळाचा पहिला तास वेगवान गोलंदाजांना मदत करेल, हलकासा गारवा आणि हवादार परिस्थिती पाहता. येथे धावा करणे कठीण असू शकतं म्हणून फलंदाजांना क्रीजवर जास्तीत जास्त वेळ घालवावा लागेल.

 

हवामान

सकाळी थोडेसे ढगाळ आणि दुपारी ऊन पडण्याची शक्यता आहे. दिवसाचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. ८१% ढगांचे आच्छादन आणि १% पावसाची शक्यता असेल. उत्तर-ईशान्येकडून वारे वाहतील.

 

माइलस्टोन अलर्ट

एलिस पेरीला १००० कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी १२४ धावांची आवश्यकता आणि ५० कसोटी विकेट्स पूर्ण करण्यासाठी १२ विकेट्स गरज आहे.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: २१-२४ डिसेंबर २०२३

स्थळ: वानखेडे स्टेडियम, मुंबई

वेळ: सकाळी ९.३० वाजता

प्रसारण: जिओ सिनेमा