रविवारी, न्यू चंदीगड येथे, भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात 281 धावांचा बचाव करता आला नाही. ऑस्ट्रेलियाने लक्ष्य केवळ दोन विकेट्स गमावून आणि 35 चेंडू शिल्लक ठेवून गाठले व तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्या सामन्यात भारताकडून तब्बल चार झेल सुटले. आता मालिका जीवित ठेवण्यासाठी ‘वुमन इन ब्लू’ ने दुसरा एकदिवसीय सामना जिंकणे आवश्यक आहे. हा सामना बुधवारी त्याच मैदानावर खेळला जाईल जिथे पहिला सामना झाला.
आमने-सामने
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आतापर्यंत 57 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी भारताने 10 सामने जिंकले आहेत तर ऑस्ट्रेलियाने 47. भारतात झालेल्या लढतींमध्ये ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे. ऑस्ट्रेलिया 21-4 अशा फरकाने आघाडीवर आहे.
संघ
भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, ऋचा घोष (यष्टीरक्षक), क्रांती गौड, अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरणी, यस्तिका भाटिया (यष्टीरक्षक), स्नेह राणा
ऑस्ट्रेलिया: अॅलिसा हीली (कर्णधार), ताहलिया मॅक्ग्रा (उपकर्णधार), डार्सी ब्राउन, निकोल फाल्टम, अॅश्ले गार्डनर, किम गार्थ, ग्रेस हॅरिस, अलाना किंग, चार्ली नॉट, फिबी लिचफिल्ड, सोफी मोलिन्यू, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शुट, अॅनाबेल सदरलंड, जॉर्जिया वोल, जॉर्जिया वेअरहॅम.
कोणत्या खेळाडूंवर लक्ष असेल
स्मृती मानधना: महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल क्रमांकच्या या फलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात धावबाद होण्यापूर्वी 63 चेंडूत 58 धावा केल्या. भारताच्या उपकर्णधाराने आपल्या आकर्षक खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. डावखुऱ्या मानधनानं प्रतिका रावलसोबत 114 धावांची सलामी भागीदारी उभारली.
स्नेह राणा: भारताची उजव्या हाताची ऑफ-स्पिन गोलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तिच्या संघासाठी सर्वोत्तम गोलंदाज ठरली. तिनं क्रांती गौडसोबत नव्या चेंडूने गोलंदाजी आक्रमणाची धुरा सांभाळली आणि 10 षटकांत 51 धावा देत एक विकेट घेतली. त्या सामन्यात भारतासाठी विकेट घेणाऱ्या दोन खेळाडूंपैकी ती एक होती. ती सर्वात किफायतशीर गोलंदाजही ठरली.
फिबी लिचफिल्ड: ऑस्ट्रेलियाच्या या डावखुऱ्या सलामी फलंदाजाने भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तिच्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. तिनं 80 चेंडूत 88 धावा ठोकल्या, ज्यात 14 चौकारांचा समावेश होता. तिला शून्यावर आणि 56 धावांवर जीवनदान मिळालं आणि तिनं भारताला मोठी किंमत मोजायला लावली. तिच्या त्या अप्रतिम फलंदाजीसाठी तिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
मेगन शुट: ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान संसनाटीने रविवारी तिचा 100वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. तिनं सात षटकांत 45 धावा देऊन दोन विकेट्स पटकावल्या. उजव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाने डावाची सुरुवात केली पण पहिल्या पॉवरप्लेमध्ये तिला यश आलं नाही. मात्र शेवटच्या टप्प्यात तिनं दोन फलंदाजांना बाद करून भारतीय डावाची धावगती रोखली, जी एका क्षणी 300 धावांपर्यंत जाण्याची शक्यता दिसत होती.
सामन्याची थोडक्यात माहिती
दिनांक: 17 सप्टेंबर 2025
वेळ: दुपारी 1:30 वाजता
ठिकाण: महाराजा यादविंद्रसिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लांपूर, न्यू चंदीगड
प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार