भारतासाठी आजचा सामना जवळजवळ “करो की मरो”

भारत आणि पाकिस्तानने त्यांच्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात विरोधाभासी केली आहे. पाकिस्तानने त्यांच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर शानदार विजय मिळवून सुरुवात केली, तर भारताला न्यूझीलंडकडून निराशाजनक पराभव पत्करावा लागला. ४८ तासांपेक्षा कमी कालावधीत, भारत पुन्हा मैदानात उतरेल. त्यांच्यासाठी हा सामना जवळजवळ करो की मरो असेल. दुसरीकडे, टी-२० विश्वचषकात प्रथमच नॉक आऊट्ससाठी पात्र होण्यास पाकिस्तानला भारताविरुद्ध विजयी होण्याचे गरजेचे असेल. जर पाकिस्तान हा सामना जिंकले तर त्यांची या स्पर्धेत पुढे जाण्याची शक्यता वाढेल.

 

आमने-सामने

भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध १५ आंतराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यापैकी भारताने १२ आणि पाकिस्तानने तीन जिंकले आहेत. या १५ सामन्यांपैकी, सात आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाचा भाग म्हणून खेळले गेले, ज्यात भारताने पाच विजय मिळवले.

 

संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजीवन सजना

पाकिस्तानः फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, गुल फिरोजा, इरम जावेद, मुनीबा अली, नशरा सुंधू, निदा दार, ओमायमा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सय्यदा आरूब शाह, तस्मिया रुबाब, तुबा हसन

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवावे

जेमिमाह रॉड्रिग्स: भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या या खेळाडूने न्यूझीलंडविरुद्धच्या मागील सामन्यात २२ मिनिटांच्या तिच्या मुक्कामात काही सुंदर फटके मारले. तिने जरी ११ चेंडूत १३ धावा केल्या असल्या तरी अलीकडच्या काळात ती चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आली आहे. भारताची मधल्या फळीतील फलंदाजी एकत्र ठेवण्यासाठी संघ तिच्यावर अवलंबून असेल.

आशा शोभना: न्यूझीलंडविरुद्धच्या मागील चकमकीत भारताच्या या चतुर लेग स्पिनरने चार षटकांत २२ धावा दिल्या आणि एक गडी बाद केला. त्या उच्च धावसंख्येच्या सामन्यात ती भारतासाठी सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरली.

फातिमा सना: पाकिस्तानच्या कर्णधाराने श्रीलंकेविरुद्धच्या तिच्या मागील सामन्यात शेवटच्या षटकांमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करत २० चेंडूत ३० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. तसेच, गोलंदाजी करताना, तिने डावाच्या तिसऱ्या षटकात विरोधी कर्णधार चमारी अथापथूला बाद करून पाकिस्तानला एक चांगली सुरुवात करून दिली. 

सादिया इक्बाल: पाकिस्तानची ही डावखुरी फिरकी गोलंदाज श्रीलंकेविरुद्धच्या मागील सामन्यात तिच्या संघासाठी सर्वोत्तम गोलंदाज होती. तिने चार षटकात १७ धावा देऊन तीन विकेट्स पटकावल्या.

 

हवामान

सुमारे ३७ अंश सेल्सिअस तापमानासह हवामान उबदार राहण्याची अपेक्षा आहे. भरपूर सूर्यप्रकाशदेखील असेल

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ६ ऑक्टोबर २०२४

वेळ: दुपारी ३:३० वाजता

स्थळ: दुबई आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार