सिराज, जैस्वाल, गिल यांनी भारताला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत आघाडीवर ठेवले

भारताच्या यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल या युवा खेळाडूंनी शनिवारी राजकोट येथे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आपल्या उल्लेखनीय फलंदाजीने सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले. जैस्वाल आणि गिल यांच्या कमालीच्या कामगिरी पूर्वी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने इंग्लंडचे एकूण चार बळी घेऊन त्यांना सर्वबाद करण्यात जास्त वेळ वाया घालवला नाही.

यजमानांनी 322 धावांची जबरदस्त आघाडी घेतली आहे आणि अजूनही आठ विकेट्स शिल्लक आहेत. जैस्वालने 133 चेंडूत 104 धावा करत या मालिकेतील दुसरे शतक झळकावले. मुंबईच्या डावखुऱ्या फलंदाजाने नऊ चौकार आणि पाच षटकारांसह प्रेक्षकांचे मनोरंजन केले. कर्णधार रोहित शर्मा (19) बाद झाल्यानंतर शुभमन गिलने जैस्वालसोबत हातमिळवणी करत दुसऱ्या विकेटसाठी 161 धावांची भक्कम भागीदारी केली. गिल ज्याच्या फॉर्मबद्दल बरीच चर्चा सुरु होती. परंतु शनिवारी त्याने सुंदर अर्ध शतक ठोकून आत्मविश्वासपूर्ण खेळी केली. या शानदार भागीदारीचा अंत जैस्वाल रिटायर्ड हर्ट होऊन तंबूत परतल्यावर झाला. नंतर रजत पाटीदारकडून चांगले प्रदर्शन अपेक्षित होते परंतु तो या सामन्यात दुसऱ्यांदा अपयशी ठरला कारण तो एकही धाव न करता बाद झाला. पहिल्या डावात त्याने केवळ पाच धाव केल्या होत्या.

इंग्लंडचे फिरकीपटू जो रूट आणि टॉम हार्टले यांनी अनुक्रमे शर्मा आणि पाटीदार यांची विकेट घेतली. गिल (120 चेंडूत नाबाद 65 धावा) सोबत नाईट वॉचमन कुलदीप यादव (15 चेंडूत नाबाद 3) भारतासाठी या कसोटीच्या चौथ्या दिवसाची कार्यवाही सुरू करतील.

दिवसाच्या सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत इंग्लंडला 319 धावांत गुंडाळले. पाहुण्यांनी दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस 207 धावा केल्या होत्या. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्यांच्याकडे आठ विकेट्स हातात असताना ते फक्त 112 धावांची भर घालू शकले. भारतासाठी सिराज (4/84) सर्वात यशस्वी गोलंदाज होता. फिरकी गोलंदाज यादव (2/77) आणि रवींद्र जडेजा (2/51) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून सिराजला चांगली साथ दिली. त्याचबरोबर, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (1/54) आणि ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन (1/37) यांनी एक-एक बळी घेतला आहे. शुक्रवारचा खेळ समाप्त झाल्यानंतर अश्विनने कौटुंबिक कारणांमुळे या कसोटीतून माघार घेतला आहे.