भारताने इंग्लंडचा 106 धावांनी केला पराभव; पाच सामन्यांची कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत

भारताने दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडला 292 धावांत गुंडाळून सोमवारी विशाखापट्टणम येथील डॉ राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर हा सामना 106 धावांनी जिंकला. या विजयामुळे भारताने ही पाच सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशा बरोबरीत आणून ठेवली आहे.

विजयासाठी 399 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने बाझबॉल प्रमाणे खेळी केली. डावाचा बहुतांश भाग ते आक्रमणावर होते आणि त्यांनी भारतीय गोलंदाजांना स्थिरावू दिले नाही. तथापि, रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह, त्यांच्या सर्व अनुभवांसह आणि गोलंदाजीच्या विविधतेचा उपयोग करून इंग्लंडच्या फलंदाजांवर भारी पडले. अश्विन (3/46), ज्याला पहिल्या डावात एकही विकेट मिळाली नाही आणि बुमराह (3/72) ज्याने पहिल्या डावात सहा बळी घेतले, हे अंतिम डावात भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले कारण त्यांनी प्रत्येकी तीन विकेट्स पटकावल्या.

पहिल्या डावात अर्धशतक झळकावणारा इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉलीने 132 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह शानदार 73 धावा केल्या. क्रॉलीशिवाय, इंग्लंडच्या इतर कोणत्याही फलंदाजाला उल्लेखनीय खेळी करता आली नाही.

बेन डकेट (28), रेहान अहमद (23), ऑली पोप (23), आणि जॉनी बेअरस्टो (26) यांनी चांगली सुरुवात केली परंतु एक मोठी धावसंख्या उभी करण्यास ते अयशस्वी होते. जो रुटने 10 चेंडूत 16 धावांची आकर्षक खेळी केली ज्यात दोन चौकारांचा आणि एका षटकाराचा समावेश होता. परंतु या आक्रमक फलंदाजीने भारतचे जास्त नुकसान केले नाही. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (11), ज्याने पहिल्या डावात 47 धावा काढल्या होत्या, श्रेयस अय्यरच्या हातून धावबाद झाला. अखेरीस, यष्टिरक्षक-फलंदाज बेन फोक्स आणि टॉम हार्टले यांनी जोरदार संघर्ष केला परंतु प्रत्येकी 36 धावा केल्यानंतर ते बाद झाले.

भारताने इंग्लंडला 292 धावांवर बाद करण्यासाठी 69.2 षटके घेतली. 292 ही भारतातील पाहुण्या संघाची चौथ्या डावातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. बुमराहने त्याच्या उत्कृस्ट गोलंदाजीच्या प्रदर्शनासाठी (9/91) सामनावीर पुरस्कार जिंकला.