डाळींच्या दरात वाढ; वरण-भात महागणार!

मुंबई: मे महिन्यांत फक्त तूर डाळीच्या किमतींमध्ये नाही तर मूग डाळ, उडीद डाळ आणि चणा डाळींच्या किंमतींमध्ये देखील वाढ झाली आहे. डाळ ही अशी एक गोष्ट आहे जी प्रत्येक भारतीयाच्या घरामध्ये दररोज शिजवली जाते. परंतु सध्या डाळींच्या वाढत्या किंमती पाहता लवकरच ही डाळ स्वयंपाक घरातून गायब तर होणार नाही ना अशी चिंता आता व्यक्त केली जात आहे.

खरंतर एप्रिल महिन्यापर्यंत डाळींच्या किमतींवर सरकारने नियंत्रण ठेवले होते. परंतु आता मे महिन्यामध्ये डाळींच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ होत आहे. कंज्युमर अफेयर विभागाची आकडेवारी पाहता सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जर अशीच या आकडेवारींमध्ये वाढ होत गेली तर स्वयंपाक घरातून डाळ नक्कीच गायब होईल.

पण आता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, मे महिन्याच्या अखेरीस या किंमती 120 रुपयाचा टप्पा पार करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण जर असे झाले तर मध्यमवर्गीय लोकांना याचा सर्वात जास्त फटका बसेल. कारण त्यांचा महिन्याचा खर्च हा ठरलेला असतो त्यामुळे महागाईमुळे त्यांचा हा खर्च बिघडण्याची शक्यता आहे.

डाळींच्या वाढत्या किंमतींमुळे सरकार देखील चिंतेत आहे. त्यामुळे डाळींच्या वाढत्या किंमती पाहता केंद्र सरकारकडून एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार, कोणीही एका महिन्यापेक्षा जास्त काळ डाळींचा साठा करुन ठेवू शकत नाही. जर कोणी असे केले तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच डाळींच्या आयातीवर देखील कठोर निर्बंध लावण्यात आलेले आहेत.

कंज्युमर अफेयर विभागाच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यामध्ये तुरीच्या डाळींची सरासरी किंमत 116.68 रुपये होती. परंतु आता 18 मे रोजी समोर आलेल्या आकडेवारीनुसार ही किंमत वाढून 118.98 रुपये इतकी झाली आहे.

उडीद डाळींच्या किंमतीत 108.23 रुपये ते 109.44 रुपयांची वाढ झाली आहे. तर चणा डाळींच्या किंमतीत 73.71 रुपये ते 74.23 रुपयांची वाढ झाली आहे.