मुंबई: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड (गोकुळ) ने म्हैस आणि गाईच्या दूध विक्री आणि खरेदी दरामध्ये वाढ केली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असला तरी ग्राहकांना त्याचा भुर्दंड बसणार आहे. आधी ६८ रुपये लिटरने मिळणाऱ्या दुधासाठी आता ७० रुपये मोजावे लागणार आहेत.
म्हशीच्या दुधासाठी प्रति लिटर एक रुपयाने आणि गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर दोन रुपयांची खरेदी वाढ केली आहे. याआधी म्हशीचे दूध प्रति लिटर 52.50 पैसे दराने खरेदी केले जायचे आता 53.50 रुपयांनी खरेदी केले जाणार आहे. तर गायीचे दूध 34 रुपयांनी खरेदी केले जायचे आता 36 रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी केले जाणार आहे. यामुळं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
गोकुळकडून म्हशीच्या दूध विक्री दरामध्ये दोन रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. याआधी म्हशीचे दूध 68 रुपयांनी विकले जात होते मात्र आता ते 70 रुपयांनी प्रतिलिटर विकले जाणार आहे. आज संध्याकाळ पासून नवे दर लागू होणार आहेत. गोकुळ संचालकांच्या बैठकीमध्ये दूध दरवाढीसंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.