राजमाता जिजाऊ रुग्णालयात रुग्णांची गैरसोय, आयुक्तांचा संताप

आयुक्तांच्या अचानक भेटीमुळे अधिकारी कर्मचाऱ्यांची तंतरली

नवी मुंबई: ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील विविध विभागांची महापालिका आयुक्तांनी अचानक पाहणी करत आरोग्य सेवांमधील त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. केस पेपर कक्षातील गोंधळ, सोनोग्राफी विभागातील विलंब आणि पाहणीदरम्यान अचानक खंडित झालेला वीजपुरवठा यामुळे रुग्णालय प्रशासनाची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी सर्वप्रथम केस पेपर कक्षाची पाहणी केली. या ठिकाणी रुग्ण आणि नातेवाईकांना कोणत्या काउंटरवर कोणती प्रक्रिया होते याबाबत स्पष्ट माहिती नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे पाहून त्यांनी तत्काळ प्रवेशद्वारावर मार्गदर्शक सूचना फलक लावण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. रुग्णांना हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी माहिती व्यवस्था सुधारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यानंतर आयुक्तांनी सोनोग्राफी केंद्राची पाहणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. सकाळी साडेआठ वाजल्यापासून तपासणीसाठी आलेल्या अनेक महिला दुपारी साडेतीन वाजेपर्यंत प्रतीक्षा करत बसल्या होत्या. संबंधित डायग्नोसिस तज्ज्ञ वेळेत उपस्थित नसल्यामुळे तपासण्या रखडल्याचे उघड झाले. यावर आयुक्तांनी तीव्र संताप व्यक्त करत “रुग्णांना तासन्तास ताटकळत ठेवणे अजिबात सहन केले जाणार नाही,” अशा शब्दांत प्रशासनाला फैलावर घेतले.

महिलांनी देखील आयुक्तांसमोर नाराजी व्यक्त करत, वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसल्याने वारंवार चकरा माराव्या लागत असल्याची तक्रार केली. काही गर्भवती महिलांना उपाशीपोटी तासनतास थांबावे लागल्याचेही समोर आले.
दरम्यान, आयुक्तांची पाहणी सुरू असतानाच रुग्णालयातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला. त्यामुळे काही काळ रुग्णालयातील कामकाजावर परिणाम झाला. यावर आयुक्तांनी संबंधित विभागाकडून तत्काळ माहिती घेत वीज यंत्रणा आणि बॅकअप सुविधांची स्थिती तपासण्याचे निर्देश दिले. रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवेत अशा प्रकारे वीज जाणे गंभीर बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाहणीदरम्यान स्वच्छता, रुग्ण मार्गदर्शन, कर्मचारी उपस्थिती आणि वैद्यकीय सेवांचा वेळेत पुरवठा याबाबत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वेळेत आणि सन्मानपूर्वक सेवा मिळाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.