मुंबई : आशियातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित अशा टाटा मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांचा गलथान कारभार समोर आला आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक धावपटूंना मेडलच मिळाली नाहीत. यामुळे काही वेळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नावाजलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत असे झाल्याने स्पर्धकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
घड्याळाच्या काट्याशी नातं सांगणारी मुंबईनगरीत आज टाटा मुंबई मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली. पहाटे सव्वा पाच वाजल्यापासून मुंबई मॅरेथॉनमधल्या वेगवेगळ्या शर्यतींना सुरुवात झाली. स्पर्धा संपल्यानंतर अनेक धावपटूंना मेडलच मिळाली नाहीत. मेडल न मिळाल्याने संतापलेल्या स्पर्धकांनी मेडल्स मिळत असलेल्या ठिकाणी गोंधळ केला. त्यानंतर आयोजकांकडून मेडल्स हरवल्याची स्पर्धकांना उत्तरे देण्यात आली आहे.
मेडल्स काऊंटर झालेली गर्दी पाहता बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी मेडल काऊंटरचा ताबा घेतला आहे. मेडल्स मिळत असलेल्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. मेडल्स मिळत नसल्याने आयोजकांना स्पर्धकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अखेर पोलिस उपायुक्त प्रविण मुंढे यांनी स्पर्धकांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र स्पर्धक ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते. स्पर्धकांची संख्या आणि मेडल्सचा ताळमेळ न जमल्याने आयोजकांची गोची झाली. मुंबई मॅरेथॉनमध्ये असे घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.
अनेक स्पर्धकांचा हिरमोड
स्पर्धकांशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली असता स्पर्धकांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभगी होण्यासाठी वेगवेगळ्या गटासाठी विशिष्ट रक्कम आकारण्यात येते. मात्र सहभागानंतर आयोजकांकडून अशी उडवाउडवीची उत्तर मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. अनेक स्पर्धकांचा हिरमोड झाला आहे.
दरवर्षी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा वेगवेगळ्या गटांमध्ये आयोजित होते. यात 42 किमी फुल मॅरेथॉन मुख्य स्पर्धा असते. 21 किमी हाफ मॅरेथॉन, ड्रीम रन अशी वेगवेगळ्या गटांसाठी सुद्धा स्पर्धा होते. यंदा मुंबई मॅरेथॉनमध्ये 59 हजारपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. फक्त मुंबईतीलच नव्हे, महाराष्ट्र, देश-विदेशातील धावपटू मुंबई मॅरेथॉनमध्य सहभागी होते. मॅरेथाॅनचं यंदाचं19 वं वर्ष होतं. अशात, मॅरेथाॅन अमॅच्युअरमध्ये यंदा अनेक धावपटू सहभागी झाले होते.