मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (बुलेट ट्रेन) स्थानक क्षेत्र विकास संबंधित उच्चस्तरीय अधिका-यांच्या झालेल्या बैठकीत ठाणे याचाही समावेश करण्यात आला आहे.
‘मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल स्थानकाच्या परिसराचा क्षेत्र विकास’ (प्रोजेक्ट-स्मार्ट) साठी सामंजस्य करार केला आहे. गुजरातमधील साबरमती, सुरत आणि महाराष्ट्रातील विरार आणि ठाणे या चार हायस्पीड रेल्वे स्थानकांसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी ‘एनएचएसआरसीएल’द्वारे अंदाजे १.०८ लाख कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. सुमारे ५०८ किमी अंतराच्या बुलेट ट्रेन प्रकल्पात १२ स्थानके असून, बुलेट ट्रेनचा प्रस्तावित वेग सुमारे 320 ते 350 किमी प्रतितास असेल.
या प्रकल्पामुळे मुंबई शहर, ठाणे, वसई, विरार, बोईसर, तारापूर, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रातील इतर ठिकाणचे प्रवासी आणि उद्योगांना फायदा होईल. मुंबई -अहमदाबाद हाय स्पीड रेल्वेच्या (एमएएचएसआर) संरेखनातील १२ स्थानकांपैकी, बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर ही ४ स्थानके महाराष्ट्रात आहेत, ज्यांची लांबी १५६ किमी इतकी आहे.
या स्थानक क्षेत्र विकासासंबंधित सुरुवातीची बैठक (किक आॅफ) एमएमआरडीएच्या कार्यालयात झाली. या बैठकीत गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय (मोहूआ), टीसीपीओ, एमआरओ, एमओआर, एमआरव्हीसी, महाराष्ट्र शासन, एमएमआरडीए, ठाणे महानगरपालिका, वसई विरार महानगर पालिका, जपान दूतावास, जायकाचे मुख्यालय, जायकाचे भारतातील कार्यालय आणि जायकाचे तज्ज्ञ उपस्थित होते. ही बैठक दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई येथे आयोजित केल्या जाणा-या स्मार्ट प्रकल्पांतर्गत स्थळपहाणी आणि परिसंवादाचा एक भाग होता. या बैठकांचे आयोजन भारत सरकार, महाराष्ट्र शासन, गुजरात सरकार आणि जायका यांनी संयुक्तपणे केले आहे.
भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे पहिले स्थानक वांद्रे कुर्ला संकुलात आहे, याचा प्राधिकरणाला अभिमान आहे. हायस्पीड रेल्वे स्थानकांच्या आसपासच्या परिसराचा विकास हा ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’वर लक्ष केंद्रित करून केल्याने निवासी आणि कार्यालयीन भागांमधील वाहतूक सुलभ होऊन रस्ते वाहतुकीवरील ताण व अवलंबित्व कमी होईल. हा प्रकल्प तांत्रिक आणि संस्थात्मक अशा बहुस्तरीय संस्थात्मक यंत्रणेचा भाग आहेत. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्राधिकरण अग्रणी राहील, असे एस.व्ही.आर श्रीनिवास म्हणाले.
‘साबरमती, सुरत, विरार आणि ठाणे एचएसआर या स्थानकांच्या परिसरातील विकासासाठी नियोजन आणि मॉडेल हँडबुक आहे. यामध्ये जपान, भारत आणि इतर देशांमध्ये ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी) आणि स्टेशनसाठी अवलंबिलेले अनुभव आणि पद्धतींचा समावेश आहे. ‘एमएएचएसआर’च्या निवडक स्थानकांच्या आसपासच्या क्षेत्राचा विकास करणे हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा संपूर्ण आर्थिक फायदा मिळावा आणि स्टेशनला अभसरण केंद्र म्हणून विकसित करावे, अशा प्रकारे दोलायमान आर्थिक आणि वाहतूक उपक्रमांना मदत करून प्रचंड सार्वजनिक लाभ होईल, असे श्रीनिवास यांनी विशेष बैठकीत सांगितले.