आमदार प्रताप सरनाईक यांचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे
ठाणे : ओवळा-माजिवड्यातील अनधिकृत झोपड्यांचा क्लस्टर योजनेत समावेश करावा, अशी मागणी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
सरनाईक यांची मागणी मान्य झाल्यास ओवळा माजिवडा मतदार संघातील विजयनगर, शास्त्रीनगर, भीमनगर, लक्ष्मी-चिरागनगर, कोकणी पाडा, गांधीनगर, नळपाडा व घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील झोपड्यांचा समावेश होणार आहे.
शहरातील क्लस्टर योजनेला आपण न्याय देत असताना झोपडपट्टीवासीयांचा सुध्दा विचार होणे तेवढेच गरजेचे आहे. मुंबईच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टयांचा विचार करता जो दर मुंबईच्या विकासकांना मिळत असतो तो दर ठाणे शहराखेरीज महानगरपालिका क्षेत्रातील इतर भागांमध्ये मिळत नसल्याने बऱ्याच ठिकाणी विकासक समोर येत नाहीत अथवा समोर आलेच तर गेल्या अनेक वर्षांपासून अनेक प्रकल्प अपुर्ण असल्याने प्रकल्पाच्या पूर्णत्वाची हमी देत येत नाही. यासाठी या सर्व अनधिकृत झोपड्यांचा क्लस्टरमध्ये समावेश करण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे.
नगरविकासमंत्री आणि मुख्यमंत्री कार्यकाळात यशस्वी झालेली पहिली क्लस्टर योजना काही दिवसांतच साकार होत असल्याबद्दल सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदनही केले आहे.