प्रशासनाने पूल पुन्हा केला बंद
डोंबिवली : निळजे-काटई-पलावा उड्डाणपुलाचे उदघाटन शुक्रवारी शिवसेना (शिंदे गट) तर्फे औपचारिकरीत्या केले. मात्र उड्डाणपुलावरील ऑइलमुळे रस्ता घसरडा झाला. अपघात होऊ नये म्हणून प्रशासनाने काही वेळातच हा पूल बंद केला.
पूल बंद केल्यानंतर लागलीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली. यावेळी उप जिल्हाप्रमुख राहुल भगत म्हणाले, घाईघाईत या पुलाचे उद्घाटन झाले. पण काही तासातच हा पूल बंद करण्यात आला. डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर बारीक खडी आणि भुसा टाकण्यात आला आहे. प्रशासनाला आमची विनंती राहील की, अर्धवट रस्ते करून जनतेच्या जीवाशी खेळू नका.
पाहणी करण्यासाठी कल्याण उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक सदाशिव गायकर, तालुकाप्रमुख विजय भोईर, उप तालुकाप्रमुख परेश पाटील, नेताजी पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. याविषयी ठाकरे शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विट केले की, काम अर्धवट असताना घाईघाईत पलावा पूल सुरू केला, दुचाकीस्वार पडले, अपघात झाले, आणि दोन तासात पूल बंद करण्यात आला. शिवसैनिक या निष्काळजीपणाविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देणार असून जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही!
तर मनसे नेते राजू पाटील त्यांनी ट्विट केले की, पलावा पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्या पुलाच्या गुणवत्तेच्या तपासणीची मागणीही केली आहे. परंतु आज स्वतःला इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणवणारे कोणताही गाजावाजा न करता आपल्या समर्थकांकडून पुल सुरू करून मोकळे झाले खरे पण काही वेळातच हा पुल बंद करण्यात आला आहे. नक्की काय गोंधळ आहे ? भैय्याजी हमार पुल ठिक है ना बा ?