मीरा-भाईंदर न्यायालयाचे शिपायाच्या हस्ते उद्घाटन

ठाणे: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी त्यांच्या हस्ते होणाऱ्या मीरा-भाईंदर येथील न्यायालयाच्या न्यायदान कक्षाचे उद्घाटन एका चतुर्थ श्रेणी शिपायाच्या हस्ते करवून “न्याय सब के लिए” ही समानता दाखवून दिली आहे. त्यावेळी त्यांनी स्वतः शिपायाच्या बाजूला आदराने उभे राहून त्याला सन्मान दिला.

चतुर्थ श्रेणी वर्गातला कोर्ट शिपाई हा तसा लक्षात ठेवण्यासारखा वर्ग नाही, परंतु न्यायालयीन कामकाजात हा वर्गही महत्त्वाचा आहे हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे.

मीरा-भाईंदर येथे नुकतेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय आणि न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन झाले आहे. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक उद्घाटक म्हणून उपस्थित होते. सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी, न्यायमूर्ती गौरी गोडसे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल, मीरा भाईंदर एडवोकेट बार असोसिएशन अध्यक्ष डी. जी. नाईक आणि मीरा- भाईंदर न्यायालयात न्यायदानाची जबाबदारी सांभाळणारे न्यायाधीश एस एस जाधव उपस्थित होते.

मीरा-भाईंदर येथे नवीन न्यायालयीन इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या हस्ते (ता.8) झाले तर ज्या कक्षामध्ये प्रत्यक्षात न्यायदान देण्याचे काम केले जाणार आहे, त्याचे उद्घाटन ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात ड वर्ग म्हणून काम करणारे शिपाई कर्मचारी आर. व्ही. दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी. न्यायमूर्ती अभय ओक आदराने उभे असल्याचे दिसून आले. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या हस्ते न्यायालयाचे उद्घाटन होणे ही नक्कीच भूषणावह बाब असून न्याय सबके लिये या ब्रीद वाक्याप्रमाणे आपली न्यायव्यवस्था चालत असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे जिल्हा सचिव न्या. ईश्वर सूर्यवंशी यांनी सांगितले.