* अरुण आशान यांची गटनेतेपदी निवड
* वंचितचा उपमहापौर बसण्याची दाट शक्यता
उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेतील सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी शिंदेसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या चढाओढीत अखेर शिंदेसेनेने बाजी मारली आहे. कोकण भवन येथे बुधवारी झालेल्या अधिकृत नोंदणीत शिंदेसेनेने ४० नगरसेवकांचे संख्याबळ दाखवत बहुमताचा ‘मॅजिक फिगर’ पूर्ण केला.
या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेच्या गटनेतेपदी अरुण आशान यांची नियुक्ती करण्यात आली असून, उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचा महापौर आणि वंचित बहुजन आघाडीचा उपमहापौर बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाला होता. निकालानंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. महापालिकेत भाजप ३७, शिंदेसेना ३६, वंचित बहुजन आघाडी २, साई पक्ष १, काँग्रेस १ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला ४० चा जादुई आकडा कोणालाही गाठता आला नव्हता.
भाजप ३७ नगरसेवकांसह सत्तेच्या उंबरठ्यावर होता; मात्र शिंदेसेनेने प्रभावी डावपेच आखत छोटे पक्ष आणि अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले. शिंदेसेनेचे ३६ नगरसेवक, वंचित बहुजन आघाडीचे २, साई पक्षाचा १ आणि एका अपक्षाच्या पाठिंब्यामुळे शिंदेसेनेचे संख्याबळ ४० वर पोहोचले. या ४० नगरसेवकांच्या गटाची कोकण भवन येथे बुधवारी शिंदेसेना म्हणून अधिकृत नोंदणी करण्यात आली, अशी माहिती नवनिर्वचित गटनेते अरुण आशान यांनी दिली.
दरम्यान, भाजप ३७ जागांवरच अडकून राहिल्याने आणि शिंदेसेनेने बहुमताचा आकडा गाठल्याने आता महापौरपदावर शिंदेसेनेचा दावा मजबूत झाला आहे. उल्हासनगरमध्ये शिंदेसेनेची सत्ता येण्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, पाठिंबा दिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीला उपमहापौरपद मिळण्याचीही दाट शक्यता आहे. महापालिकेत पक्षाची ध्येयधोरणे राबवणे आणि ४० नगरसेवकांच्या गटाचे नेतृत्व करण्याची महत्त्वाची जबाबदारी आता गटनेते अरुण आशान यांच्या खांद्यावर असणार आहे.