मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे
प्रतिपादन
ठाण्यातील विविध विकास
कामांचे भूमीपूजन आणि
लोकार्पण
ठाणे: रस्ते मोठे झाले, शहराचे सौंदर्यीकरण झाले, शहराचा विकास झपाट्याने होत आहे. ठाणे-बोरिवली टनेलला मंजुरी दिली असून येत्या काही काळात ठाणे ते बोरिवली हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात केले.
ठाणे महापालिका क्षेत्रात राज्य सरकारच्या अनुदानातून हाती घेतलेल्या तसेच आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या ओवळा-माजिवडे मतदारसंघातील विविध विकास प्रकल्पांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, आमदार प्रताप सरनाईक आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, वाहतूक कोंडीतून ठाणे शहराला मुक्त करण्यासाठी काम सुरू आहे. निरोगी शहर उभे करण्यात येत आहे. त्यादृष्टीने आजचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले जात आहे. आपल्या शहरांमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार झाले पाहिजेत. मुलांमध्ये कौशल्य आहे, त्यांच्यासाठी व्यासपीठ देण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. विकासाची ही कामे जनतेच्या पैशातून होत आहेत. त्यामुळे त्यात गुणवत्तेत कोणतीही तडजोड होता कामा नये. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कामे सुरू आहेत. तसेच संपूर्ण ठाणे व मुंबई महानगर प्रदेशात क्लस्टर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या सोहळ्यात स्पष्ट केले.
रस्ते रुंद आणि चांगले असल्यास त्या शहराची वेगाने प्रगती होते. त्यामुळे सरकाराने नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक रोड, मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक आदी प्रकल्पांना चालना दिली. लवकरच नागपू-मुंबई समृद्धी महामार्गाचे ठाणेपर्यंतचे काम पूर्ण होणार आहे. हा मार्ग संपूर्ण पर्यावरण पूरक आहे. या सरकारने लोकहिताला प्राधान्य देऊन निर्णय घेतले आहेत, असेही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.
आदिवासी विकास मंत्री श्री. गावित म्हणाले की, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आदिवासी बांधवांसाठी विविध माध्यमातून विकासाची कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. येत्या दोन वर्षात आदिवासी पाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. यामुळे आदिवासी भागाचा विकास होऊन कुपोषण, मातामृत्यू कमी होण्यास मदत होईल. तसेच आदिवासी कुटुंबांना मागील वर्षी 93 हजार घरे दिली असून यंदा सव्वा लाख घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व पाड्यांना वीज जोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना ठाणेकरांच्या मनात काय आहे ते लगेच कळते. त्यामुळे सूर्या धरणातून ठाण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रयत्नही करत आहेत. सूर्यामधून भविष्यात 250 एमएलडी पाणी मिळाले तर या भागाचा पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ठाणे महापालिका आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या कार्यक्रमात फार मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे होत आहेत. जी कामे सुरू झाली आहेत त्याचे दृश्यमान स्वरुप आता डोळ्यासमोर स्पष्ट दिसू लागले आहे. या कामांचे वैशिष्ट्य म्हणजे या कामांची गुणवत्ता ही सर्वोच्च रहावी यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे स्वतः आग्रही आहेत, असेही आयुक्त श्री. बांगर म्हणाले.
कासारवडवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्यना केंद्र, शिवसेनाप्रमुख हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व डिजिटल अक्वेरियम या दोन वास्तूंचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्यक्ष बांधकाम स्थळी केले. तर, ज्येष्ठ कवी, साहित्यिक स्व. बाबुराव मारुतीराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटर, महामानव शिव, शाहू, फुले, आंबेडकर स्मृती सभागृह यांचे लोकार्पण, आदिवासी विकास विभागाच्या विद्यार्थिनी वसतिगृह, कै. सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र यांचे भूमिपूजन रिमोटद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील कार्यक्रमातून केले.
यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर नरेश म्हस्के, मिनाक्षी शिंदे, अशोक वैती, माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे आणि संजय भोईर, माजी नगरसेविका परिषा सरनाईक, माजी नगरसेवक पुर्वेश सरनाईक, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना काळात मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या मृतदेहाची सहाशे रुपयांची पिशवी सहा हजार रुपयांना विकणारे आता मोर्चे काढत आहेत. चौकशी लागली की मोर्चे काढत आहेत. आता दूध का दूध आणि पानी का पानी होऊनच जाऊ द्या, असे आव्हानच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दिले.