सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
ठाणे : कळव्यातील आनंदनगर येथे मुकुंद कंपनीची संरक्षक भिंत बाजुलाच असलेल्या चाळीवर पडल्याची धक्कादायक घटना आज घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून सहा घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
कळवा पूर्व येथील आनंद नगरजवळ एकविरा संकुल चाळ आहे. याच चाळीला लागून मुकुंद कंपनीची संरक्षक भिंत आहे. ही भिंत जवळपास ८० फूट लांब व २० फूट उंच आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास या भागात जोरदार आवाज झाला. या आवाजाने आजूबाजूच्या घरातील नागरिक धावत बाहेर असताना संरक्षक भिंत पडल्याचे दिसून आले. ही भिंत सहा घरांवर पडली असल्याचे समजताच धावाधाव सुरू झाली. दरम्यान दुपारची वेळ असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी पिकअप वाहनासह, वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले.
एकूण सहा घरांच्या भिंती व छप्पर तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घरात एकूण २७ जण वास्तव्यास आहेत. याबाबत कंपनी प्रशासनाला पालिकेने कळवण्यात आले असून पुढील कार्यवाहीची सूचना देण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.