शिंदे सेनेच्याच वायचळ यांचा अवघ्या १५८ मतांनी निसटता विजय
ठाणे: ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने एकहाती वर्चस्व मिळवले असून शिंदेंच्या पक्षातील बाळकुम प्रभाग ८ मधील देवराम भोईर यांनी सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवला आहे. देवराम भोईर यांनी प्रतिस्पर्धी उबाठाचे उमेदवार रविंद्र चव्हाण यांच्या विरुद्ध तब्बल १७ हजार ८४० इतके मताधिक्य मिळवले आहे. दरम्यान, शिंदेच्या सेनेचेच प्रभाग क्रमांक ३ मधील विक्रांत वायचळ यांनी अवघ्या १५८ मतांचे अल्प मताधिक्य मिळवुन उबाठाचे जयनाथ पुर्णेकर यांच्या विरोधात निसटता विजय संपादीत केला.
बिनविरोध पॅटर्नमुळे राज्यभर गाजलेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. प्रभाग १३ मध्ये उबाठा सेनेच्या शहाजी खुस्पे यांनी शिंदे सेनेचे माजी महापौर अशोक वैती यांची तीन दशकांची सद्दी संपुष्टात आणली तर, प्रभाग ९ मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजीत पवार यांनी शिंदेंच्या सेनेचे उमेश पाटील या जेष्ठ नगरसेवकाला अस्मान दाखवले.
या निवडणुकीत सर्वात शेवटी निकाल बाळकुम प्रभाग क्रमांक ८ चा लागला. या प्रभागात शिंदे सेनेतील भोईर कुटुंबियांच्या चारही उमेदवारांनी एकुण मतदानाच्या ६० टक्केहून अधिक मते मिळवुन विजयाला गवसणी घातली. यात देवराम भोईर यांना २३ हजार ४१३ मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी उबाठाचे रविंद्र चव्हाण यांना ५५७३ मते मिळाली. देवराम भोईर यांनी तब्बल १७,८४० इतके मताधिक्य मिळवुन एक प्रकारे ठाण्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवण्याचा मान मिळवला आहे.
अशाच एका अटीतटीच्या लढतीत मानपाडा प्रभाग तीनमध्ये मिनाक्षी शिंदे यांनी नाराजीनाम्यातुन हट्टाने तिकिट मागुन घेतलेले शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांचा अवघ्या १५८ मतांनी विजय झाला. या प्रभागात उबाठाचे जयनाथ पुर्णेकर यांनी शिंदे सेनेच्या वायचळ यांना विजयासाठी अक्षरशः अखेरपर्यत झुंजवले. यंदाच्या निवडणुकीत वायचळ यांचे मताधिक्य अल्प ठरले.