नवी मुंबई : मोरबे धरणावर बीओटी तत्वावर सौरऊर्जा आणि जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी ६५० कोटी खर्च अपेक्षित आहे. दीड वर्षापूर्वी याच प्रकल्पासाठी ५०० कोटींची निविदा काढण्यात आली होती. त्यामुळे अवघ्या दीड वर्षात दीडशे कोटींनी हा प्रकल्प फुगल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नवी मुंबई महापालिका मालकीच्या मोरबे धरण परिसरात २० मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा आणि दीड मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प उभारण्याची प्रकिया २०११पासून सुरू होती. ह प्रकल्प बीओटी तत्वावर उभारण्यात येणार आहे. २५ वर्षे देखभाल दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेने सन २०१४मध्ये निविदा मागविल्या होत्या. त्यासाठी ३७५ कोटी खर्च अपेक्षित होता. तीनवेळा मागविलेल्या फेरनिविदेनंतर प्राप्त झालेल्या तीन निविदांपैकी मे. लॅपटेक सोल्युशन प्रा. लि. यांची निविदा मंजूर करण्यात आली होती. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज खरेदी करण्यासाठी बाजारात कोणीच खरेदीदार मिळत नसल्याने हा प्रकल्प पांढरा हत्ती ठरू नये, म्हणून तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रकल्प जुलै २०१६ ला रद्द केला होता.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या मंजुरीविना हा प्रकल्प आयुक्त रद्द करू शकत नसल्याचे कारण सांगत आयुक्तांनी रद्द केलेला हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी कंत्राटदाराने उच्च न्यायालयात दुसऱ्यांदा धाव घेतली होती. मात्र कंत्राटदाराची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. हा प्रकल्प पुनरुज्जीवीत करण्याचा निर्णय प्रशासक राजवटीत दोन वर्षापूर्वी घेण्यात आला होता. त्यासाठी निविदा प्रकिया राबवण्यात आली होती. काही तांत्रिक कारणास्तव ही निविदा रद्द करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प सुरू करण्याच्या हालचालींना पुन्हा एकदा वेग आला असून त्याच्या खर्चाची मंजुरी आल्यानंतर निविदा राबवण्यात येणार आहे.
———————————————-
मोरबे धरणावर तरंगता सौर ऊर्जा आणि जल विद्युत प्रकल्प उभारण्यात येणार असू त्यासाठी ६५० कोटी खर्च होणार आहे. त्याची मंजुरी बाकी आहे. मंजुरी प्राप्त होताच प्रकल्पाची निविदा प्रकिया राबवली जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महापालिका तीन रुपये ९० पैशांनी वीजखरेदी करणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांनी दिली.