फलाटावरून घसरून महिला रुळावर पडली
नवी मुंबई : लोकल पकडत असताना एक महिला रुळावरुन खाली पडली आणि तिच्या अंगावरुन ट्रेन गेली. या घटनेत तिचा जीव वाचला आहे पण तिला दोन्ही पाय गमवावे लागले आहेत.
पनवेलहून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी ९.३० च्या सुमारास सीबीडी बेलापूर या स्थानकात येत होती. त्यावेळी एक महिला पाय घसरुन रुळावर पडली. तिच्या अंगावरुन रेल्वेचा पहिला डबा गेला. या घटनेमुळे प्रवासी आणि रेल्वे प्रशासन यांची तारांबळ झाली. रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने काही वेळातच ट्रेन मागे घेतली आणि या महिलेचा जीव वाचवला. मात्र या घटनेत महिलेला तिचे पाय गमवावे लागले आहेत.
महिला लोकल ट्रेनखाली आल्याने अचानक लोकांनी तिथे गर्दी केली. मात्र पोलिसांनी वेळीच त्या ठिकाणी येत गर्दीवर नियंत्रण आणलं. या महिलेला जेव्हा बाहेर काढलं तेव्हा तिचे पाय रक्ताळलेले होते. दोन पोलिसांनी तातडीने उडी मारुन तिला ट्रॅकच्या मधून बाहेर काढलं. लोक या घटनेचा व्हिडीओ काढत होते. या महिलेचा जीव वाचला असला तरीही तिचे पाय तिला गमवावे लागले आहेत. त्यामुळे लोकांनीही हळहळ व्यक्त केली.