परप्रांतीयांचे मासे नाल्यात; काढायला लावल्या उठाबशा

कळव्यात मनसे कार्यकर्ते आक्रमक

ठाणे: परप्रांतीय आणि बांगलादेशी मासेविक्रेत्यांच्या विरोधात मनसेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाण्यातील कळवा परिसरात मासेविक्री करणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांना शोधून कळव्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना उठाबशा काढायला लावल्या तर त्यांचे मासे देखील नाल्यात फेकले आहेत.

मुंबईत परप्रांतीय मासे विक्रेत्यांविरुद्ध स्थानिक विक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेत बाजू मांडली होती. श्री.ठाकरे यांनीही मनसे स्थानिकांच्या सोबत राहील, अशी भूमिका घेण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कळवा परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.

कळव्यातील मासळी बाजाराबाहेर, मनीषा नगर, पारसिक नगर तसेच अन्य ठिकाणी परप्रांतीय मासेविक्रेते बसत असून हे सर्व ठाण्याच्या बाहेरचे रहिवासी आहेत. याशिवाय या मासे विक्रेत्यांकडे वास्तव्याचा पुरावा नसल्याचे मनसेने केलेल्या तपासामध्ये उघड झाले आहे. या सर्व मासेविक्रेत्यांमुळे आगरी कोळी महिलांच्या व्यवसायावर गदा येत असून यासंदर्भात त्यांनी मनसेचे उपशहर प्रमुख आणि मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदत मागितली होती.

हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर मनसेचे उप शहर अध्यक्ष ॲड. सुशांत सूर्यराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आगरी कोळी महिलांच्या मदतीने या मासेविक्रेत्यांना धडा शिकवला आहे. त्यांचे मासे अक्षरशः नाल्यात फेकून दिले. तसेच त्यांना उठाबशाही काढायला लावल्या. यापुढे बाहेरून येऊन खराब मासे विकण्याचा प्रयत्न केला तर मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा इशारा सूर्यराव यांनी दिला आहे.

यावेळी ॲड. सुशांत सूर्यराव, राजू गायकवाड, संजोग शिळकर, राजेश शिळकर, प्रसाद पोखरकर, अविनाश साळुंखे, अशोक निघुट, स्थानिक मासे विक्रेते महिला-पुरुष, हेमंत शिळकर, सुबोध सूर्यराव, शुभम उतेकर आणि भूमिकन्या आणि भूमिपुत्र सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा वंदना गौरी आदी उपस्थित होते.