आयएमए ठाणे टाइम्स घडवणार डॉक्टर-रुग्णांमधील सुसंवाद

ठाणेवैभव-आयएमए यांचे संयुक्त वार्तापत्र

ठाणे: ठाण्यात डॉक्टर आणि रुग्णांमधील स्नेह वृद्धिंगत व्हावा, त्यांच्यात सुसंवाद घडावा तसेच आरोग्य क्षेत्रातील प्रत्येक घडामोड लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने ठाणेवैभव आणि ठाणे आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने IMA Thane Times या वार्तापत्राचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले.

आयएमएचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तूरे, नॅशनल हेल्थ स्कीम अध्यक्ष डॉ.जयेश लेले, ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, आयएमए महाराष्ट्राचे नियोजित अध्यक्ष 24-25 चे डॉ संतोष कदम, गुंतवणूक क्षेत्रातले प्रसिद्ध नाव नितीन वेटे, ठाणे आयएमएचे पदाधिकारी डॉ.महेश जोशी, डॉ. सुनील बुधलानी, डॉ. मीनल गाडगीळ, डॉ. राजलक्ष्मी वालावलकर आणि ठाणेवैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांच्या हस्ते या वार्तापत्राचे काल प्रकाशन झाले. झाले. ठाणे वैभवच्या अंकासोबत हे वार्तापत्र वितरित केले जाणार आहे.

एखाद्या दैनिकाने वैद्यकीय संस्थेसाठी वार्तापत्र सुरू करण्याचा उपक्रम हा राज्यातील, किंबहुना देशातील पहिला उपक्रम असावा, असे सूतोवाच डॉ. शिवकुमार उत्तूरे यांनी केले. या वार्तपत्राला वेटे असोसिएटनी विशेष सहकार्य केले. नितीन वेटे यांनी सर्व डॉक्टरांना आर्थिक मार्गदर्शन देखील केले.