Thanevaibhav Online
14 September 2023
* मुलुंड टोलनाक्यावर प्रस्तावित टोलवाढीविरुद्ध मनसे आक्रमक
* नवघर पोलिसांनी घेतले ताब्यात
ठाणे : येत्या १ ऑक्टोबरपासून प्रस्तावित टोल दरवाढीला मनसेने तीव्र विरोध केला असून मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मुलुंड टोल नाक्यावर टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. एक रुपया जरी टोलवाढ झाली तर गाठ आमच्याशी आहे, असा सज्जड इशाराच मनसेने दिला आहे.
टोलमुक्तीसाठी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेने आता टोल दरवाढीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या ऑक्टोबरपासून ५, १०, २० आणि ३० रुपयांनी टोलमध्ये दरवाढ करण्यात येणार आहे. ही दरवाढ कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाही अशी भूमिका मनसेने घेतली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनविसेचे प्रदेश सरचिटणीस संदीप पाचंगे, शहर अध्यक्ष रवी मोरे आदी पदाधिकाऱ्यांनी मुलुंड टोलनाका येथे जाऊन टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांना टोलवाढ न करण्याबाबत निवेदन दिले.
मुलुंडचा टोलनाका वास्तविक आतापर्यंत बंद होणे अपेक्षित असताना तो अजूनही बंद झालेला नाही. हा रस्ता आता मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने एमएमआरडीए टोल कसा काय वसूल करू शकते, असा प्रश्न देखील श्री.जाधव यांनी यावेळी उपस्थित केला. सरकारने आम्हाला चर्चेसाठी बोलवावे, आम्ही चर्चा करायला तयार आहोत. मात्र यात १ रुपयानेही वाढ होऊन देणार नसल्याची भूमिका श्री.जाधव यांनी घेतली आहे. दरम्यान अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना नवघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ठाणेकर असल्याने मुख्यमंत्र्यांना हे सहज शक्य आहे. आणि मुख्यमंत्री दरवाढ होऊ देणार नाहीत अशी आमची अपेक्षा आहे, असेही अविनाश जाधव म्हणाले.
अशी आहे प्रस्तावित दरवाढ
वाहन सध्याचे दर (रुपये ) प्रस्तावित दर (रुपये )
कार ४० ४५
मिनी बस ६५ ७५
ट्रक / बस १३० १५०
अवजड वाहने १६० १९०