इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक सामन्यात पाकिस्तानचा कस लागणार

सात दिवसांच्या विश्रांतीनंतर पाकिस्तान संघ पुन्हा सज्ज झाला आहे. यावेळी त्यांचा सामना चार वेळचा विजेता इंग्लंडशी होणार आहे. कोलंबो येथे बुधवारी होणारी ही लढत पाकिस्तानसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. सलग तीन पराभवांनी विश्वचषकाची सुरुवात केलेल्या पाकिस्तानसाठी ही विश्रांती पुन्हा संघबांधणी, रणनीतीचा पुनर्विचार आणि आत्मपरीक्षणासाठी अत्यंत आवश्यक होती.

भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव अपेक्षित होता, पण बांगलादेशविरुद्धचा पराभव हा पाकिस्तानच्या समर्थकांसाठी निश्चितच धक्कादायक होता.

तसे पाहता, पाकिस्तानकडे अजून चार सामने उरले आहेत आणि प्रत्येक सामना जवळपास ‘करो की मरो’ आहे. इंग्लंडविरुद्धचा सामना त्यांच्या दृष्टिकोनातून अधिक कठीण आहे कारण महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानने आजवर कधीही इंग्लंडला हरवलेले नाही.

जर सिद्रा अमीनने मोठी खेळी केली, मुनीबा अलीने सलामीवीर म्हणून आपली क्षमता सिद्ध केली, कर्णधार फातिमा सनाने अंतिम षटकांमध्ये फटकेबाजी केली आणि सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट्स घेतले, आणि नाश्रा संधूने फिरकीच्या जोरावर इंग्लंडच्या फलंदाजांना गुंतवून ठेवले, तर पाकिस्तान विजय मिळवू शकतो. पाकिस्तानला मोठा चमत्कार घडवावा लागेल, पण अशक्य नक्कीच नाही.

दुसरीकडे, इंग्लंडने या स्पर्धेत आतापर्यंत अधिक सुसंगत कामगिरी केली आहे. दुखापतीमुळे काही काळ बाहेर असलेली माजी कर्णधार हेदर नाइट पुनरागमनानंतर संघाला अधिक स्थिरता देत आहे. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडने सहज विजय नोंदवला. मात्र बांगलादेशविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरला. त्या सामन्यात नाइटने तिच्या अनुभवाची वापर करून संघाला संकटातून बाहेर काढले.

इंग्लंडने जरी त्यांचे तिन्ही सामने जिंकले असले तर त्यांच्या संघात काही उणिवा आहेत. त्यांच्या फलंदाजीची मदार प्रामुख्याने कर्णधार नॅट सिव्हर-ब्रंट आणि नाइटवर आहे. सलामीवीर एमी जोन्स आणि टॅमी बोमाँटने पहिल्या सामन्यानंतर फारसे योगदान दिलेले नाही, तर मधल्या फळीतील सोफिया डंकली आणि अ‍ॅलिस कॅप्सी अजून लयीत आलेल्या नाहीत.

पण गोलंदाजी विभागात मात्र इंग्लंडने जबरदस्त कामगिरी बजावली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकावर असणारी गोलंदाज, सोफी एक्लस्टनने शानदार प्रदर्शन केले आहे. तिला इतर गोलंदाजांची चांगली साथ लाभली आहे आणि मिळून त्यांनी प्रतिस्पर्धी संघांना 50 षटकांच्या आतच गुंडाळले आहे.

या सामन्यात इंग्लंडला विजय मिळाल्यास ते उपांत्य फेरी खेळण्याच्या आणखी एक पाऊल जवळ जातील. पण पाकिस्तानसाठी ही लढत अस्तित्वाची आहे. आणखी एक पराभव म्हणजे त्यांचा विश्वचषक प्रवास जवळजवळ संपुष्टात येऊ शकतो.

आमने-सामने

एकूण: इंग्लंड – 13, पाकिस्तान – 0
विश्वचषकात: इंग्लंड – 4, पाकिस्तान – 0
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत: इंग्लंड – 2, पाकिस्तान – 8

संघ

पाकिस्तान: फातिमा सना (कर्णधार), मुनीबा अली सिद्दीकी (उपकर्णधार, यष्टीरक्षक), आलिया रियाज, डायना बैग, ऐमन फातिमा, नाश्रा संधू, नतालिया परवेज, ओमैमा सोहेल, रमीण शमीम, सादफ शामास, सादिया इक्बाल, शवाल झुल्फिकार, सिद्रा अमीन, सिद्रा नवाझ, सयदा अरुब शाह

इंग्लंड: नॅट सिव्हर-ब्रंट (कर्णधार), एम अर्लॉट, टॅमी बोमाँट, लॉरेन बेल, अ‍ॅलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डंक्ली, सोफी एक्लस्टन, लॉरेन फायलर, सारा ग्लेन, एमी जोन्स, हेदर नाइट, एम्मा लॅम्ब, लिन्से स्मिथ, डॅनी वायट-हॉज

कोणत्या खेळाडूंवर लक्ष असेल

नॅट सिव्हर-ब्रंट: इंग्लंडची कर्णधार नुकतीच श्रीलंकेविरुद्ध शतक ठोकून आली आहे. ज्या मैदानावर तिने शतक झळकावले त्याच मैदानावर ती पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ती एक बहुमूल्य खेळाडू आहे, कारण ती फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही मोलाची भूमिका बजावते.

सोफी एक्लस्टन: एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकावर असणारी ही सहा फूट उंचीची डावखुरी फिरकी गोलंदाज कोणत्याही संघासाठी मोठं आव्हान ठरते.

सिद्रा अमीन: पाकिस्तानच्या सर्वाधिक अनुभवी फलंदाजांपैकी एक — तिने डाव सावरणे आणि संपूर्ण डावाला दिशा देणे आवश्यक आहे.

नाश्रा संधू:  या विश्वचषकात डावखुर्‍या फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. फिरकीसाठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर ही पाकिस्तानी फिरकीपटू कमाल करू शकते.

सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: 15 ऑक्टोबर 2025
वेळ: दुपारी 3 वाजता
ठिकाण: आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
थेट प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क , जिओहॉटस्टार