फिरकी विरुद्ध फटकेबाजी – रणवीरा आणि डिव्हाइनची लढत ठरणार निर्णायक

श्रीलंका आणि न्यूझीलंड आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या गुणतालिकेत खालच्या अर्ध्या भागात झगडत आहेत. न्यूझीलंडने आपला मोहिमेचा प्रारंभ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या दोन पराभवांनी केला, परंतु तिसऱ्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध अखेर विजयाची चव चाखली. सहआयोजक श्रीलंकेला अद्याप एकही विजय मिळालेला नाही. त्यांनी गुणतालिकेत आपले खाते जरी उघडले असले तरी ते केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे शक्य झाले.

लीग टप्प्यात अजून चार सामने शिल्लक आहेत. म्हणूनच, दोन्ही संघ आपली स्थिती सुधारण्यासाठी आणि गुणतालिकेत वर जाण्यासाठी सज्ज आहेत.

न्यूझीलंडचा आत्मविश्वास आहे की ते श्रीलंकेला नमवू शकतात आणि उपांत्य फेरीसाठीच्या शर्यतीत स्वतःची शक्यता अधिक बळकट करू शकतात. कर्णधार सोफी डिव्हाइन सध्या या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे. मात्र, तिला तिच्या सहकारी फलंदाजांकडून, विशेषतः सलामीवीरांकडून अधिक पाठिंबा मिळण्याची गरज आहे. जॉर्जिया प्लिमर आणि सुझी बेट्स ही सलामी जोडी सुरुवातीला भक्कम भागीदारी करण्यात अपयशी ठरत आहे. विरोधी संघ पहिल्याच पॉवरप्लेमध्येच त्यांची भागीदारी मोडण्यात यशस्वी झाला आहे.

गोलंदाजी आक्रमणात लिया ताहूहू आणि जेस कर या वेगवान गोलंदाजांनी जबाबदारी उचलली आहे. मात्र, डावभर दबाव टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत इतर गोलंदाजांनीही सातत्याने योगदान देणे आवश्यक आहे.

न्यूझीलंडकडे अमिलिया कर, ब्रुक हॅलिडे आणि मॅडी ग्रीनसारखी दमदार प्रतिभा आहे, पण या खेळाडूंनी कर्णधारावरचा भार कमी करायला हवा. विशेषतः डावाच्या मधल्या षटकांमध्ये डावखुरी हॅलिडेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तिने शानदार फॉर्ममध्ये असणाऱ्या इनोका रणवीरा विरुद्ध जास्तीत जास्त स्ट्राइक स्वतः जवळ ठेवावी आणि तिला विकेट काढण्याची संधी नाही द्यावी.

श्रीलंकेने जरी त्यांच्या पहिल्या सामन्यात भारताविरुद्ध चांगली झुंज दिली असली तरी इंग्लंडविरुद्धच्या मागील सामन्यात त्यांचा आत्मविश्वास ढासळल्यासारखा वाटला.कर्णधार चमारी अटापट्टू आणि अनुभवी गोलंदाज उदेशिका प्रबोधनी यांच्यासारखे खेळाडू असतानाही, तो अनुभव अद्याप संघासाठी ठोस यशात रूपांतरित झालेला नाही.

श्रीलंकेसाठी गणित सोपे आहे: अटापट्टूने दीर्घ काळ फलंदाजी करत डाव सावरणे गरजेचे आहे, ज्यामुळे इतर फलंदाज तिच्याभोवती खेळू शकतील. दुसरीकडे, प्रबोधनीने सामन्याच्या सुरुवातीलाच प्रतिस्पर्धीला झटके द्यावेत. हे साध्य झाल्यास, रणवीरा डावाच्या मधल्या षटकांमध्ये न्यूझीलंडवर (ज्यांच्याकडे प्रामुख्याने उजव्या हाताचे फलंदाज आहेत) आपली फिरकीची जादू चालवू शकते.

कागदावर पाहता, न्यूझीलंड संघ अधिक बलाढ्य वाटतो आणि या स्पर्धेतील दुसरा विजय मिळवण्याच्या दृष्टीने त्यांच्यावरच पारडे जड आहे. पण, श्रीलंका, ज्यांनी कधीही न्यूझीलंडला विश्वचषकात हरवलेले नाही, ते एखादा धक्कादायक निकाल देऊ शकतील का आणि संपूर्ण गुणतालिकेचं गणितच बदलून टाकू शकतील का?

आमने-सामने
एकूण: श्रीलंका – 2, न्यूझीलंड – 13
विश्वचषकात: श्रीलंका – 0, न्यूझीलंड – 5
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत: श्रीलंका – 6, न्यूझीलंड – 5

संघ

श्रीलंका: चमारी अटापट्टू (कर्णधार), हसिनी परेरा, विश्मी गुणरत्ने, हर्षीथा समरविक्रमा, कवीषा दिल्हारी, निलाक्षिका सिल्वा, अनुश्का संजीवनी (उपकर्णधार, यष्टीरक्षक), इमेशा दुलानी, देवमी विहंगा, पिउमी वत्सला, इनोका रणवीरा, सुगंदिका दसनायक, उदेशिका प्रबोधनी, माल्की मदार, अचिनी कुलसूरिया

न्यूझीलंड: सोफी डिव्हाइन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, फ्लोरा डेव्हनशायर, इझी गेज (यष्टीरक्षक), मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, ब्री इलींग, पॉली इंग्लिस (यष्टीरक्षक), बेला जेम्स, अमिलिया कर, जेस कर, रोजमेरी मेयर, जॉर्जिया प्लिमर, लिया ताहूहू

कोणत्या खेळाडूंवर लक्ष असेल

चमारी अटापट्टू: श्रीलंकेच्या कर्णधाराला चांगली सुरुवात मोठ्या धावांमध्ये रूपांतरित करण्याची गरज आहे.

इनोका रणवीरा: ही फिरकी जादूगार मधल्या षटकांमध्ये कहर करत आहे.

सोफी  डिव्हाइन: न्यूझीलंडच्या कर्णधाराने या स्पर्धेतील तीन सामन्यांत एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावून जबरदस्त कामगिरी केली आहे.

अमिलिया कर: जागतिक अष्टपैलूंच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेली ही खेळाडू अद्याप या स्पर्धेत विशेष प्रभाव पाडू शकलेली नाही. तुलनेने कमजोर संघाविरुद्धचा सामना तिच्यासाठी फॉर्ममध्ये येण्यासाठी उत्तम संधी ठरू शकतो.

सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: 14 ऑक्टोबर 2025
वेळ: दुपारी 3 वाजता
ठिकाण: आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
थेट प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क , जिओहॉटस्टार