गुणतालिकेत अव्वल स्थानासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा संघर्ष

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने सेमीफायनलमध्ये आपले स्थान आधीच पक्के केले असले, तरी जेव्हा हे दोन शानदार संघ आमनेसामने येतील, तेव्हा गुणतालिकेतील अव्वल स्थानासाठी चुरशीची लढत रंगणार आहे.

गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्याचे महत्त्व इतिहासही अधोरेखित करतो. मागील दोन विश्वचषक आवृत्त्यांमध्ये, ज्यात प्रत्येकी आठ संघ होते आणि स्पर्धा राऊंड-रॉबिन पद्धतीने पार पडली होती, गुणतालिकेत अव्वल स्थानी राहणाऱ्या संघाने शेवटी विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे, आकडेवारी आणि अलीकडच्या इतिहासावरून पाहता, अव्वल स्थान मिळवणे केवळ प्रतिष्ठेसाठीच नाही तर पुढील सामन्यांसाठी गती कायम ठेवण्यासाठीही निर्णायक ठरू शकते.

सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे, तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या. जो संघ हा सामना जिंकले तो गुणतालिकेत अव्वल क्रमांक प्राप्त करेल.

सात वेळचे विश्वविजेते आणि विद्यमान विजेते असलेल्या ऑस्ट्रेलियाचा या स्पर्धेतील प्रवास आतापर्यंत जबरदस्त राहिला आहे. जसं 2022 मध्ये त्यांनी एकही सामना न गमावता किताब जिंकला होता, तसंच 2025 मध्येही त्यांनी आपली विजयी लय कायम ठेवली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्यांचा वर्चस्व स्पष्ट दिसून आले. कर्णधार अ‍ॅलिसा हीली अनुपस्थित असूनही, ताहलिया मॅकग्रा हिच्या अप्रतिम नेतृत्वाखाली त्यांनी नॅट सिव्हर-ब्रंटच्या संघावर दणदणीत विजय मिळवला. ट्रान्स-तस्मान प्रतिस्पर्धी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही त्यांनी आपल्या फलंदाजीचे सामर्थ्य दाखवून दिलं. 128 धावांवर पाच विकेट्स गमावल्यानंतर अ‍ॅशले गार्डनरने दबावाखाली शतकीय खेळी करून संघाला 326 धावांपर्यंत नेलं आणि विजय मिळवून दिला. हीच ऑस्ट्रेलियाची खरी ओळख आहे, एका खेळाडूवर अवलंबून न राहता त्यांच्याकडे अनेक ‘मॅच विनर्स’, जागतिक दर्जाचे अष्टपैलू आणि तगडी फलंदाजी आहे.

जर एखादा संघ या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला आव्हान देऊ शकतो, तर तो म्हणजे दक्षिण आफ्रिका. इंग्लंडविरुद्धच्या त्या निराशाजनक पराभवानंतर लॉरा वुल्वार्ड्टच्या नेतृत्वाखालील संघाने पाच सलग विजयांसह दमदार पुनरागमन केलं. त्यांनी प्रत्येक सामन्यात लढाऊ वृत्ती आणि जिद्द दाखवली. मारिझान काप, टाझमिन ब्रिट्स आणि क्लोई ट्रायॉनचा अनुभव असो किंवा नादिन डी क्लर्क आणि कर्णधार वुल्वार्ड्टची दबावाखाली प्रभावी प्रदर्शन करण्याची क्षमता असो, दक्षिण आफ्रिका खऱ्या अर्थाने विजेतेपदासाठी सज्ज दिसत आहे.

मात्र आकडेवारी ऑस्ट्रेलियाच्याच बाजूने आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला आतापर्यंत फक्त एकदाच, 2024 मध्ये, कापच्या चमकदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर, ऑस्ट्रेलियात पराभूत केलं आहे.

मग प्रश्न असा आहे की, दक्षिण आफ्रिका इतिहास रचून ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच विश्वचषकात पराभूत करेल का? की सात वेळचे विजेते पुन्हा एकदा आपली आक्रमक लय कायम ठेवत सेमीफायनलमध्ये अव्वल स्थानासह प्रवेश करतील?

कसंही असो, हा अव्वल स्थानासाठीचा सामना केवळ औपचारिकता नाही, तर प्रतिष्ठा, आत्मविश्वास आणि विजयाची मालिका टिकवण्याचा निर्णायक संघर्ष ठरणार आहे.

आमने-सामने
एकूण: ऑस्ट्रेलिया – 16, दक्षिण आफ्रिका – 1
विश्वचषकात: ऑस्ट्रेलिया – 8, दक्षिण आफ्रिका – 0
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत: ऑस्ट्रेलिया – 1, दक्षिण आफ्रिका – 4

सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: 25 ऑक्टोबर 2025
वेळ: दुपारी 3 वाजता
ठिकाण: होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर
थेट प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओहॉटस्टार