लाखोंचा कपडा जळून खाक
भिवंडी: शहरातील धामणकर नाका परिसरात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता एका डाईंगला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत डाईंगमधील लाखोंचा कपडा जळून खाक झाला आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांसह दोन टँकरना पाचारण करण्यात येऊन अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
शहरातील धामणकर नाका येथील अजंठा कंपाउंडमधील नशिराबाद मशीदजवळ महाकाल यार्न डाईंग होती. त्यामध्ये काही वर्षांपासून मालक प्रकाश मित्तल यांनी कपड्याची डाईंग सुरु केली आहे. या कंपनीकडे जाण्यास रस्तादेखील नाही. भर लोकवस्तीमध्ये ही डाईंग सुरु केल्याने परिसरातील नागरिकांनी मनपाकडे तक्रारी केल्या होत्या. आज या डाईंगला आग लागल्याने परिसरातील लोकवस्तीचा धोका झाल्याने नागरिकांनी आपल्या घरातून पळ काढला.
आगीचे कारण अस्पष्ट असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी होऊन लाखोंचे नुकसान झाले आहे.