ठाणे : पावसाने जोर धरल्याने ठाण्यात घोडबंदर, मुंब्रा आदी रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असून त्याचा फटका परिवहन सेवेला बसत आहे. बुधवारी मुसळधार पावसामुळे हे रस्ते कोंडीत अडकल्याने परिवहन सेवेच्या फेऱ्या कमी होऊन उत्पन्नात घट झाली.
बुधवारी दिवसभर पावसाने थैमान घातले होते. रात्री ८ वाजेपर्यंत १११ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक मंदावून मोठी कोंडी झाली. शीळफाटा परिसर जलमय झाल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. त्यामुळे या रस्त्यांवर महापालिकेच्या परिवहन सेवेला बसफेऱ्या कमी कराव्या लागल्या.
दररोज ३७० ते ३८० बसफेऱ्या होत असताना बुधवारी शहरात टीएमटीच्या ३५१ बसफेऱ्या झाल्या. परिणामी रोज २७ ते २८ लाखांचे उत्पन्न मिळणाऱ्या सेवेला काल २५ लाख ५० हजारांचे उत्पन्न मिळाले. जवळपास दीड लाखाचे उत्पन्न कमी मिळाल्याची माहिती परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिली.