उष्णतेचा काटा ४३वर; जिल्ह्यात घामाच्या धारा

Screenshot

ठाणे: या वर्षाचा उन्हाळा अतिशय कडक होणार असून त्याची चुणूक मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच दिसू लागली आहे. मुंबई महानगर क्षेत्रासह अंतर्गत कोकणात उष्णतेच्या लाटेने भीषण रूप धारण केले असतानाच रविवारी मुंबई उपनगरे, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईत तापमानाचा पारा ४१ अंशांच्या पुढे सरकला.

ठाणे जिल्ह्यातील भातसानगर येथे तब्बल ४३ अंश इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली असून, अंतर्गत कोकणात सरासरीपेक्षा ५ ते ७ अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आजचा रविवार हॉट ठरला आहे.

सागरी वाऱ्यांमुळे मुंबई शहर, डहाणू आणि रत्नागिरीत तापमान ३३ ते ३५ अंशांच्या दरम्यान स्थिरावले आहे. मात्र, समुद्रकिनाऱ्यापासून दूर असलेल्या पट्ट्यात कोरड्या हवेमुळे उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.


रविवारचे तापमान
​भातसानगर: ४३.०, ​बिरवाडी: ४२.८, ​कर्जत: ४२.७, ​पलावा: ४२.६, ​मुंब्रा/ठाणे: ४१.१ ते ४२.२, ​कल्याण/डोंबिवली: ४१.८ ते ४१.९, ​ऐरोली/नेरुळ: ४०.० ते ४०.८

सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागल्याने दुपारी १२ ते ४ या वेळेत ठाणे आणि कल्याणमधील मुख्य बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. अंबरनाथ, बदलापूर आणि कर्जत पट्ट्यात उष्णतेची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांनी विशेषतः महिला आणि ज्येष्ठांनी घराबाहेर पडणे टाळले.

वाढत्या उष्णतेमुळे घरात वातानुकूलित यंत्रे, फ्रीज आणि पंख्यांचा वापर वाढला असून लिंबू सरबत, कोकम सरबत घेऊन उष्णतेची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न नागरिक करत आहेत. तर बाहेर पडलेल्या नागरिकांची थंड पेये आणि रसवंती गृहांवर गर्दी दिसून येत होती.

सागरी वाऱ्यांच्या प्रभावामुळे किनारपट्टीवर तापमान मर्यादित असले, तरी अंतर्गत भागात जमिनीवरील कोरड्या वाऱ्यांमुळे ‘हीटवेव्ह’ची स्थिती आहे. पुढील काही दिवस हा परिणाम जाणवू शकतो अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.