एक कोटीहून अधिक किमतीेचेे सोन्याचे दागिने हस्तगत
ठाणे: बंद घराचे दार उचकटून, ग्रील तोडून एकट्या मुंब्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ४८ घरे फोडणाऱ्या चोरट्याला ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून एक कोटीपेक्षा जास्त किमतीचे एक किलो सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
शिवाजी संते (३१) असे या सराईत चोरट्याचे नाव असून तो टिटवाळा येथे राहणारा आहे. त्याने मुंब्रा भागात ४८ घरफोड्या केल्या आहेत तर कल्याण आणि उल्हासनगर या पोलिस ठाण्यात यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत. या ४८ घरफोड्या त्याने मागील दोन वर्षांत केल्याची कबुली दिली असल्याची माहिती मंगळवारी ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मागील दोन वर्षांत दिवा पूर्व, मुंब्रा या परिसरात बंद घरांचे बाथरूम, खिडकीचे ग्रील उचकटून तसेच मुख्य दरवाज्याचा कडी-कोयंडा उचकटून मागील दोन वर्षांपासून घरातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात तब्बल ४८ गुन्हे दाखल झाले होते, परंतु त्या गुन्ह्यांतील आरोपी पोलिसांना मिळून येत नव्हता.
या गुन्ह्यांबाबत पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गुन्हे शाखेस सुचना दिल्या होत्या. त्यानुसार मागील सहा महिन्यांपासून गुन्हे शाखा घटक १चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांचे पथक त्या आरोपीच्या शोधात होते. त्यातच ८ फेब्रुवारी २०२६ रोजी दिवा पूर्व मुंब्रा येथे बंद घराचे मुख्य दरवाज्याचे कडी-कोयंडा व टाळे तोडुन घरफोडी चोरी झाली होती. या दाखल गुन्ह्याच्या समांतर तपासामध्ये घटनास्थळावर मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार एक संशयित त्या दिवशी घटनास्थळावर आल्याचे गुन्हे शाखा घटक १ चे पोलिस हवालदार संदीप महाडीक, पोलिस शिपाई प्रशांत लवटे, अमोल ढावरे आणि सागर सुरळकर यांना आढळून आले होते. त्या संशयितास २ मार्च रोजी टिटवाळ्यातून अटक करण्यात आली. त्याने मुंब्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील दोन वर्षांपासून एकूण ४८ गुन्ह्यांची कबुली दिली. त्या गुन्ह्यांतील चोरलेला एक कोटी ३९ लाख रूपये किमतीचे १.०३ किलो वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. त्याला बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी घटनास्थळावर येतांना व गुन्हा करून परताना प्रवासासाठी विविध साधनांचा वापर करत होता. आपले अस्तित्व लपवण्यासाठी तो सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रीकरणात येणार नाही यासाठी उलट्या दिशेने प्रवास करायचा असेही पोलिसांनी सांगितले.